आपला जिल्हा

ग्रामपंचायतीच्या इशाराऱ्यानंतर खेर्डीतील खोके, टपऱ्या हटविण्यास सुरुवात

चिपळूण – एस्टीच्या जोरदार धडकेत तरूण अभियंता अनिकेत दाभोळकर याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर खेर्डीतील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच ऐरवणीवर आला आहे. ग्रामपंचायतीने या अतिक्रमणांविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेत कारवाईसंदर्भात नोटीसा बजावताच अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अनधिकृत खोकेधारक, टपरीधारकांनी कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून खोके, टपऱ्या हटविण्यास सुरूवात केली आहे. मात्र बड्या व्यावसायिक अजूनही तिथेच ठाण मांडून आहेत. यामुळे ग्रामपंचायतीने गरिबांवर कारवाई करताना बड्या व्यावसायिकांवर मेहेरबानी ठेवू नये, अशी मागणी होऊ लागली आहे.

चिपळूण-कराड मार्गावर खेर्डीतील दत्तमंदिर स्टॉप समोरील भाजीपाला व्यावसायिकाच्या ठिकाणी एसटीने धडक दिल्यानंतर तरूण अभियंता असलेल्या अनिकेत दाभोळकर याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात निष्पाप अनिकेतचा बळी गेल्यानंतर खेर्डीत संतापाची लाट उसळली. राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या अतिक्रमण विरोधात लोकांची जाहीर नाराजी व्यक्त व्हायला लागली. यातूनच खेर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली. शिवाय अतिक्रमण काढण्याची मागणी करीत पार्कीग संदर्भात चिपळूणप्रमाणे खेर्डीत नियमावली लागू करण्याची मागणी केली. दरम्यान खेर्डी ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी सुमारे ५० हून अधिक व्यावसायिकांना नोटीसा दिल्या. त्याचा परिणाम म्हणून गेल्या तीन-चार दिवसात हातगाड्या, टपरी तसेच अनधिकृत पार्किंग करणारे व्यावसायिक यांना काहीसा आळा बसला आहे. परंतु कारवाईचे निवेदन देताना उपस्थित असलेल्या काही बड्या नेत्यांची अतिक्रमणे जैसे थे राहिली आहेत. ग्रामपंचायत कारवाई करणार की राष्ट्रीय महामार्ग, कारवाई कोणत्या आधारे करणार, याची चाचपणी हे बडे व्यावसायिक करीत आहेत. सामान्य टपरी, खोकेधारकांवर कारवाई करतानाच ग्रामपंचायतीने बड्यांना सवलत देऊ नये, सर्वाना एकच नियमावली लागू करावी अशी मागणी काही व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button