आपला जिल्हा

पारदर्शकतेने निवडणूका पार पाडण्यासाठी विद्यापीठाला उशिरा सुचलेले शहाणपण – विद्यापीठ विकास मंच

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – अधिसभा निवडणुकीच्याबाबत मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेला कार्यक्रम स्थगित केला असून पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी विद्यापीठाला उशिरा का होईना सुचलेले शहाणपण आहे असे विद्यापीठ विकास मंचचे मत आहे.

मुंबई विद्यापीठाने पदवीधर निवडणूक तात्पुरती मतदार यादी १८ मे २०२३ रोजी प्रसिद्ध केली, यामध्ये एकूण १ लाख १३ हजार मतदारांपैकी ७२ हजार मतदार वैध ठरवले व इतर ४० हजार मतदारांना अपिल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या अपिलनंतर मुंबई विद्यापीठाने अंतिम ९४ हजार मतदारांची यादी प्रसिद्ध केली. या ९४ हजार मतदार यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर यामध्ये अनेक गडबड गोंधळ जाणवून आला व ही मतदार यादी सदोष असून याबाबत सर्व पडताळणी केल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये याबाबत दिनांक १ ऑगस्ट रोजीच विद्यापीठ विकास मंचाने विद्यापीठाला अवगत करून दिले होते. या सर्व प्रकाराची माहीती महामाहीम राज्यपाल यांना देखिल ई-मेलच्या माध्यमातून कळविण्यात आली होती. तसेच याबाबत अनेक लोकप्रतिनिधीनां देखील अवगत करण्यात आले होते.

या प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये विद्यापीठ विकास मंचला अनेक आक्षेप असून ७२ हजार मतदारानंतर अपिल मध्ये वाढलेल्या २२ हजार मतदारांबाबत विद्यापीठ प्रशासन कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देऊ शकले नसून अनेक अपील दाखल न केलेल्या मतदारांचे देखिल नाव यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तसेच या मतदार याद्यांमध्ये ७५० पेक्षा अधिक दुबार नाव आढळून आले आहेत त्यामुळे या मतदार यादीची पडताळणी झाली नसल्याबाबत विद्यापीठ विकास मंच साशंक असून याची सखोल चौकशी झाल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये याबाबतसुद्धा पत्र देण्यात आले होते. आम्हाला अपेक्षा होती की विद्यापीठ यामध्ये योग्य निर्णय करेल परंतु, विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि त्यामुळे आजची संभ्रमावस्था निर्माण झाली असून हे विद्यापीठाच्या विश्वहार्यतेसाठी दुर्दैवी आहे.

विद्यापीठ विकास मंच मागणी करते की, सदर मतदार यादीची सखोल पडताळणी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी. या मतदार यादीमध्ये कुठल्याही दुबार नावांचा समावेश होणार नाही याची काळजी करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधार कार्ड तसेच पदवी प्रमाणपत्राची सत्यता पडताळावी. तसेच या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. लवकरात लवकर सर्व प्रकिया योग्य पद्धतीने पार पाडून पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहिर करावा. विद्यापीठ विकास मंचाने या निवडणुकीची सर्व तयारी केली असून सर्व १० पैकी १० जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विद्यापीठाच्या व्यापक हिताच्या अजेंडा घेऊन विद्यापीठ विकास मंच या निवडणुकीला सामोरे जात असून या निवडणुकीत आम्ही नक्कीच घवघवीत यश प्राप्त करू असा विश्वास विद्यापीठ विकास मंचाचे निमंत्रक चंद्रगुप्त (हर्षद) भिडे व अभाविप कोंकण प्रदेशमंत्री अमित ढोमसे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button