आपला जिल्हा

तळेकांटेच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. सुषमा बने यांच्या अभिष्टचिंतन समारंभास मा. आमदार बाळ माने यांची उपस्थिती!

संगमेश्वर – तालुक्यातील तळेकांटे येथे झालेली एकमेव सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक भाजपाच्या सौ. सुषमा बने यांनी संघर्षपूर्ण रीतीने जिंकून प्रस्थापितांना धक्का दिला. माजी आमदार तथा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा अविस्मरणीय विजय खेचून आणल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिष्टचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी लोकनेते बाळासाहेब माने, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माधवी माने व युवा नेते श्री. मिहीर माने उपस्थित होते.

निवडणूक तिरंगी झाली असली तरी खरी लढत शिवसेना पुरस्कृत उमेदवारासोबत होती. “बाळसाहेब माने यांनी अचूक रणनीती आखून विजयाची आधारशीला रचली आणि स्थानिक युवा कार्यकर्त्यांनी नेटाने किल्ला लढवून विजयश्री खेचून आणली. तसेच ग्रामस्थांनी प्रेमरूपी दिलेले मत सार्थकी लावण्यासाठी मी पुढील ५ वर्षे कोणताही भेदभाव न बाळगता मा. पंतप्रधान मोदीजी व मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली अंत्योदयासाठी अविरत परिश्रम करेन.” अशा शब्दांत सरपंच सौ. सुषमा बने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आज सांडीमवाडीने २० वर्षांपूर्वी पाहिलेल्या एका दिव्य स्वप्नाची पूर्तता झाली. ग्रामपंचायत तळेकांटेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा हा निर्धार सौ. सुषमा बने यांना सरपंचपदी विराजमान करून पूर्ण झाला. आमच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आम्हाला सहकार्य करणाऱ्या बाळासाहेब माने यांच्या रुपात रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेत पुन्हा एकदा कमळ फुलवण्यासाठी आमचे योगदान देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढे ‘अबकी बार… बाळ माने आमदार’ हीच घोषणा दुमदुमली पाहिजे. असे ग्रामस्थांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून बाळासाहेब माने यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बाळ मानेही लोकांच्या भावना समजून घेत आपल्या संबोधनात म्हणाले, “साक्षात परमेश्वरस्वरूप श्रीरामरायाने त्याकाळी वनवास भोगला. काँग्रेसच्या काळात दुसऱ्या वनवासाला सामोरे जावे लागले. मात्र राष्ट्रगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी २०२४ च्या २२ जानेवारीला रामरायाची प्राणप्रतिष्ठा समारंभपूर्वक करणार आहेत. आणि आपले भाग्य म्हणजे, आपणही उपलब्ध माध्यमांतून या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत. बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्याही आयुष्यात असा काळ येऊन गेला; मात्र प्रभू श्रीरामाचे प्रेरक चरित्र आणि तुमच्या सर्वांचा दृढनिश्चय पाहून आता ‘वह दिन भी दूर नहीं’ याची मनोमन खात्री पटली आहे. तळेकांटेवासियांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, केंद्रात आणि राज्यात आपले सरकार होतेच आता गावातही आपलेच सरकार आहे. येणाऱ्या काळात खासदार आपला असेलच पण आमदार, जि. प. सदस्य आणि पं. स. सदस्य ही आपलाच असणार आहे. तेव्हा विकासाच्या यात्रेत, अंत्योदयाच्या प्रभातफेरीत सर्वांनी आपले योगदान द्या. माझे नवनिर्वाचित सरपंच व त्यांच्या संपूर्ण टीमला हेच सांगणे आहे, की लोकांना लाभ मिळवून देण्यात आपली ग्रामपंचायत फक्त तालुक्यात, जिल्ह्यात नाही तर राज्यात क्रमांक १ वर आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. अडचणीच्या वेळी मी तुमच्यासोबत असेन याची खात्री बाळगा. सर्वांना आगामी दीपोत्सवाच्या आणि ग्रा.पं. विजयाच्या शुभेच्छा!”

यावेळी रत्नागिरी (द) जिल्हा सचिव श्री. भाई जठार, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये, संगमेश्वर (उ) तालुका उपाध्यक्ष श्री. राजेश आंबेकर, गावचे प्रतिष्ठीत नागरिक व वाडीचे प्रमुख श्री. परशुराम सांडीम, श्री. हरिश्चंद्र सांडीम, माजी उपसरपंच श्री. अनंत सांडीम, श्री. सखाराम सांडीम, नवनियुक्त ग्रा.पं. सदस्य श्री. रविंद्र सांडीम, सदस्या सौ. राजश्री सांडीम, सौ. कल्याणी सांडीम, माजी सरपंच श्री. अनंत रेवाळे, श्री. प्रकाश रेवाळे, श्री. मंगेश रेवाळे, श्री. बाबू रेवाळे, श्री. विजय रेवाळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button