आपला जिल्हा

जंगलवाडी परिसरात गवारेड्यांचा धुमाकूळ,. शेतकरी चिंतेत ; भातशेतीचे नुकसान करण्याची शक्यता..

संगमेश्वर – तालुक्यातील रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावरील जंगलवाडी, देवळे परिसरात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला असून या भागातील शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

देवळे, जंगलवाडी, चाफवली, परिसरात आंबा हंगामापासूनच गवारेड्यांचा त्रास शेतकरी वर्गाला होत आहे. बागांमधील आंबा, काजूची झाडे मोडून टाकत असल्याच्या तक्रारी या भागातील शेतकरी करत आहेत. तसेच आंबा कलमांना घासून आंब्यांची मोठी नासधूस केल्याचे शेतकरी सांगत आहेत. आठ ते दहा गव्यांचा कळप सध्या जंगलवाडी, देवळे फाट्यावर दिसत असल्याने लोकांमधे घबराट पसरली आहे. कारण या फाट्यावरूनच देवळे, चाफवली, मेघी या भागातील महिला, विद्यार्थी, प्रवाशांना उतरून पुढे प्रवास करावा लागतो. याच भागात गवारेड्यांचा वावर असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतीचे नुकसान केल्यानंतर वनविभागाकडे दाद मागायला गेल्यास पंच याद्या, सात बारा अशा फेऱ्या मारून शेतकरी हैराण होतात. आता या गव्यांपासून शेती कशी वाचवावी, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. वनविभागाने त्वरित यावर उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button