स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी संगमेश्वर – चिपळूण विधानसभेअंतर्गत भाजपा कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा संयोजकांच्या उपस्थितीत देवरुख येथे संपन्न..

देवरुख – भारतीय जनसामान्यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य प्राप्त केले. या काळातील संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. प्रत्येक भारतीय मनात या लढ्याचा अभिमान आहे. या दैदिप्यमान इतिहासाची आठवण चिरंतन काळ टिकावी यासाठी प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. याच अनुषंगाने केंद्र सरकारने मागील वर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु करून प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या घरावर तीन दिवस तिरंगा फडकवण्याचा अधिकार दिला. यावर्षी अमृत काळातील या अभियानाचे स्वरूप अजून विस्तृत करून देशभक्तीची वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
यामध्ये ‘हर घर तिरंगा’ सोबत ‘मेरी माटी, मेरा देश’ आणि ‘विभाजन विभीशिका स्मृती दिवस’ संपन्न होणार आहेत. याकरीता भारतीय जनता पार्टी संगमेश्वर-चिपळूण विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक काल सोमवार दि. ७ ऑगस्ट रोजी देवरुख येथील भाजपा कार्यालयात पार पडली.
यावेळी ‘विभाजन विभीशिका स्मृती दिवस’ अभियानाचे जिल्हा संयोजक प्रशांत डिंगणकर, ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाचे जिल्हा संयोजक संयोग उर्फ दादा दळी आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ. ऋषिकेश केळकर मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी विधानसभेचे संयोजक सदानंद भागवत यांनी संगमेश्वरमध्ये करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच संपूर्ण अभियानादरम्यान देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर चर्चा केली.
हे अभियान आदर्श पद्धतीने राबवून लोकांच्या मनातील राष्ट्रभावना उद्दीप्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी रत्नागिरी (द.)चे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व संगमेश्वर-चिपळूण विधानसभेचे निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्त्वात काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला.
सदर बैठकीसाठी सुशांत मुळ्ये, श्री. रूपेश कदम, गुरव काका, यशवंत गोपाळ, प्रशांत रानडे, संजय इंदुलकर, सौ. श्रद्धा इंदुलकर तसेच योगेश मुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



