औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाची अंतिम मुदत वाढवा – अभाविप
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

महाराष्ट्र मध्ये अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया ही ऑनलाइन पध्द्तीने महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षामार्फत राबविली जाते. त्यानुसार औषधनिर्माणशास्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया देखिल महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्ष मार्फत सुरू करण्यात आली असून, या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी २६ जुलै २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पदवीच्या अंतिम वर्षाचे गुण नमूद करणे आवश्यक असते परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाले नसल्या कारणाने या विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय न होता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे यासाठी पदव्युत्तर प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्यात यावी याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्ष आयुक्त मा.महेंद्र वारभुवन यांची भेट घेत अभाविप मार्फत निवेदन देण्यात आले.
“महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षाची अंतिम मुदत २६ जुलै असून डॉ बाबासाहेब आंबडेकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे निकाल अजून जाहीर झाले नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षाने विद्यार्थी हिताचा विचार करत औषधनिर्माणशास्र पदव्युत्तर प्रवेशाची मुदतवाढ करत विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा” असे मत अभाविप कोंकण प्रदेशमंत्री अमित ढोमसे यांनी व्यक्त केले.
अभाविप च्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्ष आयुक्त मा .महेंद्र वारभुवन यांनी सर्व विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या निकालाबाबत आढावा घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल असे अभाविप शिष्टमंडळाला आश्वस्त केले.



