आपला जिल्हा

रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य तुकाराम येडगे यांना धामणी गणातून उमेदवारी द्यावी ; समाज संघटनेची आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी.

संगमेश्वर – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी दावे केले जात आहेत. संगमेश्वर तालुक्यातील धामणी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण असल्याने या गणातून तुकाराम येडगे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी संगमेश्वर तालुका धनगर समाज संघटनेच्यावतीने आमदार शेखर निकम यांच्याकडे करण्यात आली आहे.

तुकाराम येडगे हे सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस ( अजित पवार ) गटाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत तर त्यांच्याकडे जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्था, देववरुख या धनगर समाजाच्या मातृसंघटनेचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष पद आहे. ते आमदार शेखर निकम यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळेच धामणी पंचायत समिती गण  राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी घेवून त्या जागी तुकाराम येडगे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

तुकाराम येडगे यांचे सामाजिक क्षेत्रात चांगले काम असून त्यांनी राजिवली ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून आदर्शवत काम केले आहे तर सन २०१४ ते २०१९ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळात सदस्य म्हणून विकासात्मक कामे केली आहेत. त्यांचा सामाजिक क्षेत्रातील अभ्यास पाहता आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ते पात्र उमेदवार असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी संगमेश्वर तालुका धनगर समाज संघटेनकडून करण्यात आली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील धनगर समाज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे तर विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीला आहे. संगमेश्वर मधील मताधिक्यामध्ये धनगर समाजाचा मोलाचा वाटा आहे. विधानसभा निवडणुकीत पाठीशी उभा राहिलेल्या धनगर समाजाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी संघटनेची मागणी आहे. तशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने आमदार शेखर निकम यांना देण्यात आले आहे.

धामणी पंचायत समिती गणातून तुकाराम येडगे यांना उमेदवारी मिळावी म्हणून संघटनेच्या वतीने आमदार शेखर निकम यांची भेट घेतली त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण झोरे, माजी अध्यक्ष श्री. दत्ताराम शेळके, कार्याध्यक्ष श्री. सुनिल बोडेकर, सचिव श्री. अभीजीत शेळके, श्री.शांताराम बावदाने, श्री.प्रकाश झोरे, श्री.विनोद शिंदे, श्री. आखाडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button