स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही दख्खन पूर्व धनगरवाडी अंधारातच

- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही दख्खन पूर्व धनगरवाडी अंधारातच
- मी हयात असेपर्यंत तरी वीज घरी पोहचेल का? वृध्देचा शासनाला उद्वीग्न सवाल
- सध्याच्या पिढीला सोयीअभावी भोगाव्या लागताहेत मरणयातना
साखरपा – आंबा घाटातील एका दरीत वसलेली संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडी पूर्व ९ कुटुंब असलेली लोकवस्ती. मात्र जागेअभावी वस्तीपर्यंत रस्ता पोहचला नाही परिणामी महावितरणला परवडत नाही म्हणून वीज नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही दख्खन पूर्व धनगरवाडी अंधारातच आहे.
नागरी सुविधा पासून वंचित असल्याने तात्पुरत्या स्वरूपात अनेक कुटुंबे स्वतःच घर-दार शिवार सोडून स्थलांतरीत झाली आहेत. मात्र परिस्थिती अभावी इथल्याच मातीत रहाणं भाग पडलेलं कुटुंब आदिवासी जीवन जगत आहेत. आंबा घाटातील कळकदरा स्टॉपच्या पश्चिमेला एका खोल दरीत धनगरवाडी पूर्व गावची लोकवस्ती आहे. धनगर बांधवांचा शेती आणि पशुपालन हा प्रमुख व्यवसाय असल्याने जनावरांना पुरेसा चारा मिळावा यासाठी पूर्वजांनी या ठिकाणाची निवड केली. मात्र सध्याच्या पिढीला सोयीअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
वस्तीत वीजपुरवठा व्हावा यासाठी रीतसर मागणी आणि ७ कुटुंबांनी वीज मीटरची २०१७ साली देयक भरणा केले. मात्र या प्रकारास आठ वर्षे उलटून गेली तरी अंमलबजावणीचा पत्ता नाही. लोकशाही दिनात सुद्धा या विषयावर आवाज उठविण्यात आला होता. मागील वर्षी देवरूख येथे झालेल्या जनता दरबारात गावचे पोलीस पाटील रविंद्र फोंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर महावितरणची टीम घटनास्थळी भेट देऊन केवळ पाहणी करून गेली. आधुनिक युगात वीजे शिवाय पर्याय नाही. मात्र या वाडीतील नवीन पिढीतील कुटुंबांना विजेच्या सोयी अभावी एक एक करत घरं दारं शेत शिवार मनाविरूद्ध सोडावं लागलं.
मात्र परिस्थिती अभावी ९० वर्षाची वृद्धा, तिचा मुलगा, सुन आणि तीन सहा वर्षाखालील नातवंडे असे ६ जण प्रतिकूल परिस्थिती वर मात करत हलाखीचे जीवन जगत आहेत. सभोवती घनदाट जंगल, बिबटे, रान रेडे, कोल्हे, कोळसुंदे अशी हिंस्त्र श्वापदे यांचा मुक्त वावर त्यातच रात्रभर पूर्ण अंधार. अशा भयावह परिस्थितीशी तोंड देत एक एक दिवस पुढे ढकलणाऱ्या या कुटुंबाच्या घरी वीज कधी पोहचणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर मी हयात असेपर्यंत वीज पोहचेल का? असा उद्विग्न सवाल येथील बनाबाई पांडुरंग फोंडे या वृद्ध महिलेने विचारला आहे. या वृद्धेची आर्त हाक शासन दरबारी पोहचते का? यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.



