आपला जिल्हा

कुटगिरी येडगेवाडीतील बंद पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशालाही सरपंचांचे आव्हान; आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

संगमेश्वर : कुटगिरी येडगेवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) यांनी राजीवली ग्रामपंचायतीला दिले आहेत. गटविकास अधिकारी (गट-अ) यांच्या स्वाक्षरीने ३ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रामुळे या वादग्रस्त प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

पंचायत समितीच्या पत्रानुसार, कुटगिरी-येडगेवाडी येथील सरकारी विहिरीवरून काही ग्रामस्थांना खासगी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याच्या वादातून मागील महिन्यात पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. या निर्णयामुळे ११ कुटुंबांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

त्यानंतर रत्नागिरी जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी जिल्हा परिषद आढावा बैठकीत हा विषय आरोग्य व सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद करत त्या अनुषंगाने पंचायत समितीने राजीवली ग्रामपंचायतीला तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले असून, केलेल्या कार्यवाहीचा अहवालही तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही अद्याप प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशालाच सरपंचांकडून आव्हान दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांनी इशारा दिला असून, आदेशाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास तसेच आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या संबंधित सरपंचांवर शासकीय आदेश न पाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पंचायत समिती संगमेश्वर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

या प्रकरणामुळे कुटगिरी-येडगेवाडीतील पाणीप्रश्न अधिकच चिघळला असून, प्रशासनाच्या आदेशानंतरही प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू होतो का आणि ग्रामपंचायत त्याची किती लवकर अंमलबजावणी करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button