गडनदी धरणाकडे जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग अपग्रेड केल्यास पर्यटनाला चालना मिळणार ; सा.बां कडे HAM मधून मंजूरीची मागणी.

संगमेश्वर :- तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गापासून आरवली पासून पुर्वेकडील गावांना जोडणारा आरवली ते येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ हा अपग्रेड करण्याची मागणी होत आहे. या रस्त्यावरील गडनदी धरण प्रकल्पाकडे पर्यटनासाठी जाणारी वाहतूक लक्षात घेता या रस्त्याला अपग्रेड करण्याची मागणी वाढू लागली आहे. सध्या हा रस्ता “आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४४ म्हणून अस्तित्वात आहे. हा रस्ता एकेरी असून या मार्गाची रुंदी वाढवून दुपदरी करण्याच्या दृष्टीने या संपुर्ण ३३ कि.मी रस्त्याच्या लांबीला Hybrid Annuity Model (HAM) मधून मंजुरी मिळावी अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती.मनिषा पाटणकर – म्हैसकर यांच्याकडे याबाबत विनंती केली आहे तशा आशयाचे पत्र श्रीमती. पाटणकर – म्हैसकर यांना देण्यात आले आहे.
आरवली – येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ हा आरवली येथून सुरुवात होवून येडगेवाडी, गायकवाडवाडी या ठिकाणी शेवट होत आहे.
गायकवाडवाडी ते नेरदवाडी हा रस्ता प्रस्तावित असून पुढे नियोजित संगमेश्वर – पाटण घाटमार्गाला जोडण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. पुढील काही वर्षांचा विकास आराखडा लक्षात घेता प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४४ हा रस्ता अपग्रेड करणे अनिवार्य असल्याचे मत संतोष येडगे यांनी यावेळी व्यक्त केले.
आरवली – येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ या रस्त्यावर कि.मी १६ या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला १ हजार १५१ कोटी रुपयांचा गडनदी धरण प्रकल्प असून या धरण प्रकल्पावरुन वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. गडनदी वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निविदांची कामे पूर्ण झाली असून वीजनिर्मिती सुरु करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता आरवली – येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग. क्र.४४ हा पर्यटन आणि वाहतूकीच्या दृष्टीने अपग्रेड करण्याचा मागणी वाढत असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्यात येत आहे.



