युवकांना मिळाली योग्य दिशा : ऋणानुबंध संस्थेचे पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर यशस्वी

मुंबई : युवकांना पोलीस भरती प्रक्रियेची अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये होतकरू तरुणांचा टक्का वाढावा या हेतूने ऋणानुबंध संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले. या शिबिरास परिसरातील अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक चाचणी मार्गदर्शक श्री. राजेश पुंडे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे धावणे, गोळाफेक आदी घटकांची तांत्रिक माहिती देत योग्य सराव पद्धती, संतुलित आहार व नियमित फिटनेस यांचे महत्त्व अधोरेखित केले.
पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे व पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कोलापटे यांनी लेखी परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यासाचे प्रभावी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि सेवेत आवश्यक असलेली शिस्त, प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच महसूल सहाय्यक शाहीर विकास लांबोरे यांनी प्रेरणादायी विचार मांडत युवकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शिलेदारांनी उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले. युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ऋणानुबंध संस्था सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यातही अशा मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.



