संगमेश्वर – पाटण घाटमार्ग डीपीआर कार्यारंभ आदेश अंतिम टप्प्यात ; जानेवारीपासून सर्व्हेक्षण
सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्या देखरेखीत पार पडणार सर्ल्हेक्षण

संगमेश्वर – तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गापासून सुरु होणाऱ्या संगमेश्वर – पाटण घाटमार्ग सर्व्हेक्षण कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून या कामाचा कार्यरंभ आदेश अंतिम टप्प्यात आला आहे.संगमेश्वर ते पाटण या ४६ कि.मी मधील लांबीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेयर्स ॲन्ड इंजिनीअरींग कंसल्टंट लि. ( Monarch Surveyors And Engineering Consultants LTD ) या कंपनीला देण्यात आले आहे. सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम उत्तर रत्नागिरी कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्या उपस्थितीत मोनार्च कंपनीच्या तांत्रिक टीमची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सर्व्हेक्षण कामाचे नियोजन ठरणार असल्याची माहीती संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जानेवारी २०२५ मध्ये येथील सर्व्हेणाला प्रत्यक्षात सुरुवात होवून सर्व्हेक्षण अहलातून तयार झालेला डीपीआर शासनाला सादर होणार आहे. संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामासाठी समन्वय संतोष येडगे यांचा सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरु असून त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे.
संगमेश्वर ते चाफेर ( पाटण ) हा एकूण ४६.६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासन दरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे समन्वयक संतोष येडगे यांनी सांगितले.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग डीपीआर साठी महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. डीपीआर साठी तरतूद केलेल्या निधीसाठी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
संगमेश्वर पासून सुरु होणा-या या घाटमार्गाचा कोसुंब,करंबेळे, वाशी,धामणी ,तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग , चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे,नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे, आदी आणि खाडीपट्ट्यातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परीसरातील गावांमधील लाखो नागरीकांना या मार्गाचा फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे हा रस्ता पुर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे भूमिपूजन १९९९ मधील युती सरकारच्या काळात झाले होते. सध्या युती सरकार सत्तेत आहे आणि याच सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प पुर्ण व्हावा अशी जनतेची अपेक्षा आहे. या घाटमार्गासाठी दोन्ही जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अघिक जनता आग्रही आहे.



