येडगेवाडी नळपाणी योजना काम नियमानुसार करण्याच्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचना.
येडगेवाडी नळपाणी योजना कामाला सुरुवात करावी संतोष येडगे यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी साठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रती माणूस ५५ लिटर या प्रमाणे सन २०११ च्या जनगणनेनुसार ५०९ तर २०५३ च्या संपल्पीत आराखड्यानुसार ९५९ लोकसंख्येला प्रतीदिन ६३ हजार लीटर पाण्याच्या मागणीनुसार जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी १ कोटी ३५ लाख ३५ हजार ४०२ रुपये मंजूर केले आहेत. येडगेवाडी नळपाणी पुनर्जोडणी नळपाणी योजनेचा फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यारंभ आदेश दिला होता मात्र निविदा मुदत १२ महीन्यांची असताना १० महीने उलटून ही अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने येथील काम तातडीने सुरु करावे अशी मागणी संतोष येडगे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पूजार यांच्याकडे केली आहे.
कुटगिरी येडगेवाडी नळपाणी योजना मंजुरीसाठी प्रस्तावित करताना सर्व तांत्रिक बाबींचा विचार करुन येडगेवाडीला पुरेल इतक्या पाण्याची क्षमता असलेल्या विहिरीची जागा निश्चित करुन त्या पध्दतीने अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. अंदाजपत्रकाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पूजार यांच्या सहीने त्या कामाचा कार्यारंभ आदेश पारीत करण्यात आला आहे. बहुप्रतिक्षीत कामाचा शुभारंभ होवून जनतेला पाणी मिळावे अशी मागणी येडगेवाडीकरांची आहे. तांत्रिक बाबी आणि येडगेवाडीला पुरेल इतके पाणी लक्षात घेवून विहीर आणि पाईपलाईन चे काम सुरु करावे अशी मागणी संतोष येडगे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पूजार यांना केली आहे.
संतोष येडगे यांनी १४ ॲागस्ट २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून येडगेवाडी नळपाणी योजनेतील कामाबाबत होत असलेल्या अनियमिततेबद्दल तक्रार केली होती. मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हाधिका-यांना येडगेवाडी नळपाणी योजनेचे काम तपासून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार रत्नागिरी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्ववंशी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पूजार यांना पत्र लिहून येडगेवाडी नळपाणी योजनेतील काम नियमानुसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पत्र संतोष येडगे यांना प्राप्त झाले आहे. आता प्रतीक्षा न करता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाणी पुरवठा विभागाला येडगेवाडी नळपाणी योजना कामाला नियमानुसार सुरुवात करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती संतोष येडगे यांनी जिल्हा परिषद सीईओ यांना केली आहे.



