काटवली धनगरवाडीत २५ ते २७ डिसेंबर दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

संगमेश्वर – तालुक्यातील काटवली धनगरवाडीत दरवर्षी तीन दिवसाच्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.पेण तालुक्यातील वढाव येथील इंचगिरी सांप्रदाय गुरुभक्त मंडळाचे संस्थापक सुखनिवासी प.पु सदगुरु लक्ष्मण महाराज यांना सदगुरु मानत ही परंपरा सुरु झाली प.पु लक्ष्मण महाराजांनी ग्रामिण भागातील अनेक खेड्यांमध्ये जावून आपले शुध्द विचार पटवून दिले.इंचगिरी सांप्रदायाच्यावतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताहांचे आयोजन केले जाते. मार्गदर्शनपर किर्तनांद्वारे परीवर्तन घडवले जाते. प.पु लक्ष्मण महाराजांच्या विचाराने प्रभावीत होवून गावतील दारुबंदीला लगाम घालण्यासाठी सुरु केलेल्या या सप्ताह परंपरेला या वर्षी ४८ वर्ष पुर्ण होत आहेत.

काटवली धनगरवाडीतील सप्ताहनिमित्त दारुबंदी, अंधश्रध्दा , या सारख्या विषयांवर किर्तने , प्रवचनांद्वारे जनजागृती करत दरवर्षी एक नवा विचार आणि संकल्पना दिली जाते. प्रबोधनाच्या उद्देशाने सुरु केलेल्या सप्ताहाला उत्फुर्त प्रतिसाद मिळत गेल्याने तब्बल ४७ वर्षानंतर ग्रामस्थांनी विठ्ठल-रुक्मीनी मंदीर उभारले सध्या काटवली धनगरवाडी येथे एक भव्य विठ्ठल – रुक्मीणी मंदिर तयार आहे.
इंचगिरी सांप्रदाय गुरुभक्त मंडळाचे चे संस्थापक पेण वढाव चे तपस्वी संत श्री.लक्ष्मण महाराज यांचे २०१४ ला वृध्दापकाळाने देहावसान झाले मात्र ही सदगुरु परंपरा टिकवत त्यांच्या पश्चात त्यांचे जेष्ठ सुपुत्र सदगुरु तुळशीदास दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाते नियोजन अखंडीत सुरु आहे.
बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता विणापूजन आणि सत्यनारायन महापुजेने या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे . सायंकाळी ४ वाजता हभप ज्ञानेश्वर येडगे यांचे प्रवचन, सायंकाळी ७ वाजता महाड, दाभोळे, येडगेवाडी, काटवली मंडळांचा मिळून सामुदायिक हरीपाठ, तर रात्री ९ वाजता ह.भ.प प्रभाकर वाजे महाराज यांचे किर्तन होणार आहे. गुरुवारी दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी सांयकाळी ४ वाजता प्रभाकर महाराज वाजे यांचे प्रवचन , ७ वाजता महाड, दाभोळे, येडगेवाडी, काटवली मंडळांचे मिळून सामुदायिक हरीपाठ तर रात्री ९ वाजता सदगुरु तुळसीदास दादामहाराज यांचे किर्तन होणार आहे .शुक्रवारी दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत दादामहाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.
२५ डिसेंबर ते २७ डिसेंबर या दरम्यान पार पडणाऱ्या सप्ताह कार्यक्रमासाठी सांप्रदायचे प्रमुख सदगुरु दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प गंगाराम शेळके महाराज, यांच्यासह राजाराम झोरे, शांताराम झोरे, आनंद शेळके, गंगाराम शेळके, दीपक येडगे, रामचंद्र शेळके, जनार्दन झोरे आणि गावातील सर्वच कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.



