निवडणुका लढवणे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आवाक्याबाहेर-आमदार शेखर निकम

चिपळूण- आजच्या घडीला निवडणुका लढवणे हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काम राहिलेले नाही. वाढता खर्च, बदलते राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक आव्हाने लक्षात घेता पुढील निवडणूक कशी लढवायची, हा प्रश्न माझ्यापुढेही उभा आहे, असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, सध्याच्या राजकारणात आर्थिक, सामाजिक आणि संघटनात्मक ताकद अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. पूर्वीप्रमाणे केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुका जिंकणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीसाठी योग्य नियोजन आणि व्यापक चर्चा आवश्यक आहे. मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि प्रभावी संघटन या सर्व गोष्टींचा सखोल विचार करूनच पुढील भूमिका ठरवावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. पुढील निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पर्यायांचा विचार केला जाईल आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे आमदार निकम यांनी स्पष्ट केले.



