बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकपूर्व कामांची आढावा बैठक संपन्न; निवडणुक आयुक्तांनी व्यक्त केले समाधान

मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकपूर्व तयारी कामांचा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला.
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेली पूर्वतयारी परिपूर्ण असल्याचे नमूद करत, राज्य निवडणूक आयोगाने समाधान व्यक्त केले.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव श्री. सुरेश काकाणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण मतदार संख्या व मतदान केंद्र, मतदार यादी विभाजन, प्रस्तावित मतदान केंद्रांचे वर्गीकरण, आवश्यक मतदान यंत्रे, मतदान यंत्रे साठवणूक व्यवस्था, निवडणूक साहित्य, मतदान केंद्रावरील सोयी-सुविधा, निवडणुकीसाठी आवश्यक अधिकारी – कर्मचारी वर्ग आदी विविध विषयांचा श्री. वाघमारे यांनी आढावा घेतला.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेली पूर्वतयारी परिपूर्ण आहे. मतदान केंद्रांवरील सुविधा वाढवून त्याची प्रभावी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. मागील सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आलेल्या अडचणींचे निराकरण कशा प्रकारे झाले, याचा विचार करून यंदा अधिक सक्षम उपाययोजना राबवाव्यात. मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पडावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. सर्वांनी पारदर्शक व निर्भयपणे कामकाज करावे, असे निर्देश श्री. वाघमारे यांनी दिले.



