येडगेवाडी,गायकवाडवाडी,नेरदवाडी रस्त्याला तातडीने मंजुरी मिळावी ; १४ कोटी निधी ची आवश्यकता.

संगमेश्वर – तालुक्यातील गडनदी धरण कुंचांबे ते येडगेवाडी, गायकवाडवाडी हा रिंग रोड तयार असून या रिंगरोडवरुन २००९ पासून नियमित वाहतूक सुरु आहे मात्र गायकवाडवाडी च्या पुढे रिंग रोड खंडीत असून पुढील रिंगरोड साठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे संतोष येडगे यांनी विनंती केली असता पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता यांना पत्र लिहून या कामाला मंजुरी देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांसह संतोष येडगे, दिलीप सावंत यांनी ११ जानेवारी २०२३ रोजी या रिंगरोड सर्वेक्षण कामाची पाहणी केली होती या रिंगरोड साठी १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या कामाला तातडीने मंजुरी मिळून मे २०२४ अखेर हे काम पुर्ण होईल असा विश्वास संतोष येडगे यांनी व्यक्त केली आहे.

कुचांबे ते येडगेवाडी हा एकूण १५ कि.मी चा रिंगरोड असून या कामासाठी जलसंपदा विभागाचा १५ कोटी रुपये खर्च झाला होता तर सन २०११ साली याच रस्ता डांबरीकरण कामासाठी ३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. कुचांबे ते येडगेवाडी हा रस्ता ३.७५ मिटर रुंदीचा असून सध्या या रस्त्याची रुंदी ५.५० मिटर एवढी होणार आहे. आरवली,मुरडव, कुंभारखानी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी हा रस्ता पुढे नेरदवाडी ला जोडल्यास संगमेश्वरकडे जाणारे अंतर कमी होवून स्थानिकांना त्याचा थेट लाभ होणार आहे. येडगेवाडी, गायकवाडवाडी ते नेरदवाडी हा ६ कि.मी नविन रस्ता तयार करणेचा प्रस्ताव असून त्याची मंजुरी प्रक्रिया तातडीने व्हावी अशी मागणी संतोष येडगे यांची आहे.



