ताज्या घडामोडी

मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील गोरेगाव येथील ‘नॉन सीआरझेड’ क्षेत्रातील पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

मुंबई – मुंबई किनारी रस्‍ता (उत्‍तर) वेसावे ते भाईंदर प्रकल्प पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव येथे १.२ किलोमीटर लांबीच्‍या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील ‘नॉन सीआरझेड’ क्षेत्रात पुलाच्या फाऊंडेशनचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज या कामाची पाहणी केली. सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्रात (CRZ) सर्व परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कामकाज करता येणार नाही, असे श्री. बांगर यांनी स्‍पष्‍ट केले.

पश्चिम उपनगरातील वेसावे, अंधेरी (पश्चिम), मालाड, गोरेगाव या ठिकाणी मुंबई किनारी रस्‍ता (उत्‍तर) प्रकल्प अंतर्गत होऊ घातलेल्‍या कामांची प्रत्‍यक्ष पाहणी आणि आढावा श्री. बांगर यांनी घेतला.

मुंबई किनारी रस्‍ता (उत्‍तर) प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड इत्‍यादी भागातील रहदारी कमी व प्रवास गतिशील होणार आहे. तसेच, प्रवास वेळ, इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे. वाहतूक व्यवस्थापनात देखील सुधारणा होणार आहे. त्‍यामुळे मुंबई किनारी मार्ग (उत्‍तर) या महत्‍त्‍वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्‍पास वेग द्यावा. प्रकल्‍प कामात येणारे संभाव्‍य अडथळे दूर करण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा. प्रकल्‍प पूर्ततेसाठी विविध शासकीय प्राधिकरण/ मंडळे यांच्‍याकडे पाठपुरावा करावा. महानगरपालिकेच्‍या विविध विभाग अंतर्गत समन्‍वय साधावा, असे स्‍पष्‍ट निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.

महानगरपालिका पूल विभागाचे अधिकारी, महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळ (MSRDC), अदानी वीज कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button