आपला जिल्हा

धनगर समाजाचा आधारवड हरपला ; शंकरराव झोरे यांचे निधन

संगमेश्वर – तालुक्यातील नेरदवाडी या छोट्याशा गावात सर्वसामान्य कुटुंबात ५० च्या दशकात जन्मलेल्या शंकरराव झोरे यांना बालपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. प्रतिकूल परिस्थितीत मुंबईत उदरनिर्वाह करत आपला छंद जोपासत सामाजिक कार्यात स्वतःला समर्पित करुन समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. आज २० ॲागस्ट रोजी त्यांचे निधन झाल्याने समाजाचा आधारवड हरपल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.

शंकरराव झोरे यांनी धनगर नेते बी.के कोकरे, बापू शेंडगे, अण्णा डांगे अशा समाजातील चळवळीत काम करणाऱ्या मोठ्या नेत्यांसोबत काम केले. ८० व ९० च्या दशकात धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाची मोठी चळवळ महाराष्ट्रात उभी राहीली होती या चळवळीत कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करत शंकरराव झोरे यांनी कोकणातील समाज चळवळीत सामील करुन घेतला होता. त्यांच्या मनात समाजाप्रती प्रेम होते.त्यांचे संघटन कोशल्य उत्तम होते.

संगमेश्वर ते पाटण घाटमार्ग व्हावा म्हणून शंकरराव झोरे यांनी तत्कालीन पालकमंत्री तथा संगमेश्वर – लांजा मतदारसंघाचे आमदार रविंद्र माने यांना आग्रह करुन तातडीची कार्यवाही करण्याची विनंती केली होती. शंकरराव झोरे यांच्या विनंतीनुसार तत्कालीन पालकमंत्री रविंद्र माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ना. नारायण राणे यांना १९९९ साली मौजे पाचांबे या ठिकाणी आणून संगमेश्वर ते पाटण घाटमार्ग कामाचे भूमिपूजन केले होते. पाचांबे या छोट्याशा गावात मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्याची किमया शंकरराव झोरे यांच्या नेतृत्वामुळे यशस्वी झाली.

शंकरराव झोरे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समाजात जनजागृती करत समाजाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी काम केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल समाज नेहमीच घेत आला आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजात अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. शंकरराव झोरे यांच्या निधनामुळे समाजात हळहळ व्यक्त होत असून समाजाने एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व गमावल्याचे दुःख सर्वच स्तरातून व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button