आधार आनंद ट्रस्ट च्या स्वयंमरोजगार मार्गदर्शन शिबीराला प्रचंड प्रतिसाद

चिपळूण – आधार आनंद ट्रस्ट, चिपळूण आणि जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील माधव सभागृहात दि. १० ऑक्टोबर रोजी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पाचशेहून अधिक विद्यार्थी, बचत गटातील महिला, व्यापारी उपस्थित होते. या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. सहभागी झालेल्या विद्यार्थी महिलांनी आधार आनंद ट्रस्टच्या या उपक्रमाचे कौतुक केले व या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ भविष्यात निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्याताई कुलकर्णी, जिल्हा व्यवस्थापक अमरदिप गायकवाड केंद्र शासनाच्या आर्थिक समावेश विभागाचे समुपदेशक यशवंत बर्वे, बँक ऑफ इंडियाच्या कृषी प्रक्रिया केंद्राच्या व्यवस्थापिका प्रतिमा जाधव, घरडा कॉलेजचे प्राध्यापक प्रतीक ओक आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आधार आनंद ट्रस्टचे अध्यक्ष समीर कदम यांनी प्रास्ताविक केले. निवेदिका मीरा पोतदार यांनी आधार आनंद ट्रस्टची माहिती उपस्थितांना दिली व स्वयंरोजगार मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. आधार आनंद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
या मेळाव्यात विद्याताई कुलकर्णी यांनी शासनाच्या विविध योजनांची अत्यंत विस्तृतपणे माहिती दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा उद्योग केंद्राची टीम स्वयंरोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित होती. भविष्यातही जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून धडपड, जिद्द असणाऱ्या महिलांसाठी, बेरोजगारांसाठी केंद्राचा मदतीचा हात पुढे असेल, अशी ग्वाही या वेळी विद्याताईंनी दिली. यशवंत बर्वे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत बचत गटातील महिलांना कर्ज कशा पद्धतीने दिले जाते, याची माहिती देताना विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, विविध प्रकारची अनुदाने याबाबतचे मार्गदर्शन केले मायक्रो फायनान्स याविषयी विस्तृतपणे सांगताना यशस्वी व्यावसायिकाची गुरुकिल्ली, व्यवसायासाठी सोशल मीडियाचा उपयोग कसा करून घेता येईल, याबाबतही त्यांनी विस्तृत विवेचन केले. बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी प्रतिमा जाधव यांनी कर्ज घेताना कोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात, कोणते फॉर्म कसे भरावे, याबाबतचे मार्गदर्शन केले. प्राध्यापक प्रतीक ओक यांनी स्टार्टअप सपोर्ट कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थी महिला यांच्या विविध प्रश्नांना उपस्थित तज्ञ मंडळींनी उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका मीरा पोतदार यांनी केले. आणि आभार प्रदर्शन सेक्रेटरी मंगेश पेढांबकर यांनी मानले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार आनंद ट्रस्टचे उपाध्यक्ष संतोष तडसरे शिवराज कापडी सेक्रेटरी मंगेश पेढांबकर सह सेक्रेटरी श्रीराम देवळेकर खजिनदार लक्ष्मण शिंदे सह खजिनदार प्रकाश देसाई अविनाश केळसकर राजेंद्र महाडिक संजय चिपळूणकर मंहमद रियाने राकेश राऊत मनोहर खेडेकर विजय चितळे या सर्वानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.



