आपला जिल्हा

श्री रामवरदायीनी देवीचा नवरात्रोत्सव १५ पासून

चिपळूण – तालुक्यातील दसपटीची कुलस्वामिनी श्री रामवरदायीनी देवीचा नवरात्रोत्सव आश्विन शु.प्रतिपदा रविवार दिनांक १५ ऑक्टोबर पासून आश्विन शु.दशमी मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर या दरम्यान पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र मजरे दादर येथे कुलस्वामिनी श्री रामवरदायिनी देवीचे भव्य दिव्य असे मंदिर आहे.सुमारे सातशे वर्षांचा या मंदिराला इतिहास आहे. सन २००१ मध्ये या पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार झाला असून अत्यंत भव्य असे मंदिर दसपटकर मंडळींनी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून बांधले आहे. अत्यंत जागृत आणि भक्तांच्या नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे. मुख्य मंदिरात श्री रामवरदायीनी,श्री महिषासुर मर्दिनी,श्री वाघजाई,आणि श्री त्रिंबकी देवींच्या संगमरवरी दगडातील अत्यंत सुबक अशा मूर्ती आहेत.मंदिरात प्रवेश करताच १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते.एकाच ठिकाणी १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते असे बहुधा हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असावे.त्यामुळे राज्याच्या विविध भागातून असंख्य भाविक येथे वर्षभर दर्शनासाठी येत असतात.त्यानंतर पुढे आल्यावर श्री गणपती,शिर्डीचे साईबाबा यांची लहान मंदिरे असून मंदिराच्या दोन्ही बाजूला भव्य असे दीपस्तंभ उभे आहेत.मंदिरावर आणि परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई आहे त्यामुळे.निसर्गसंपन्न रम्य अशा परिसरातील हे मंदिर पाहून भाविक मंत्रमुग्ध होतात.

मंदिरात सकाळी साडेआठ, दुपारी साडेबारा,सायंकाळी साडेसहा वाजता आरती होते तर रात्री साडे नऊ वाजता महाआरती केली जाते.या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.प्रतिवर्षाप्रमाणे दररोज रात्री स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे तर दसऱ्याला सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम देखील होणार आहे तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष प्रतापराव शिंदे आणि सरचिटणीस श्री.मनोहर शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button