आपला जिल्हा

खेर्डी विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळाचा ‘वटसावित्री’ चलतचित्र नजरेला भुरळ घालतोय ; मंडळांचे सल्लागार दशरथ दाभोळकर, रत्नागिरी जिल्हा बॅंकेच्या संचालक दिशा दाभोळकर, अध्यक्ष शशांक भिंगारे यांचे विशेष प्रयत्न.

चिपळूण – सार्वजनिक गणेशोत्सव हे सामाजिक प्रबोधनासाठी एक उत्तम आणि सक्षम पर्याय ठरू लागले आहेत. गेली दहा वर्षे हाच एक ध्यास उराशी बाळगत खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती, रूढी-परंपरा जपत आहे. खेर्डीचा राजा म्हणून प्रसिध्द असलेल्या या गणेशोत्सवातील यावर्षीचा ‘वटसावित्री` हा चलचित्र देखावा नजरेला अक्षरश: भुरळ घालतो. वटपौर्णिमेचे महत्त्व सांगणाऱ्या या देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त रिघ लावत आहेत.

विठठलवाडी गणेश मित्र मंडळाच्या खेर्डीचा राजा गणेशोत्सवाचे यावर्षी दहावे वर्ष आहे. यानिमित्त मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी केली आहे. या गणेशोत्सवाचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा गणेशोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे वट सावित्री हा चलचित्र देखावा. मंडळाचे सल्लागार, खेर्डीचे माजी सरपंच व उद्योजक दशरथ दाभोळकर यांच्या संकल्पनेतून आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून साकारण्यात आलेला हा देखावा लक्षवेधी ठरत आहेच, शिवाय भारतीय संस्कृती व परंपरेचेही साक्ष देत आहे. लहान मुलांसह महिला वर्गाला या देखाव्याने आकर्षित केले आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी वटसावित्रीचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, सात जन्मी हाच पती मिळो म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रतामागे एक पारंपारिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक अख्यायिका सांगितली जाते. निसर्गत: दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे सवंर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीत आहे. आम्ही पतीव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी असे गाणे म्हणत वटपूजेचा हा हुबेहूब प्रसंग या देखाव्यात अंतर्भूत करण्यात आला आहे. यामुळेच तो अतिशय लक्षवेधी ठरत आहे. याशिवाय मंडळाने प्रवेशव्दारापासून गणेशोत्सव मंडपापर्यंत रस्त्याला कडेला झाडांचे महत्त्व सांगणारे विविध फलकही उभारले आहेत. एकूणच, खेर्डीचा राजा गणेशोत्सव हा सामाजिक प्रबोधनाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा केंद्रबिंदू ठरलेला पहायला मिळत आहे. हा गणेशोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे सल्लागार दशरथ दाभोळकर, विकास ढवण, माजी अध्यक्ष प्रशांत दाभोळकर, विद्यमान अध्यक्ष शशांक भिंगारे, उपाध्यक्ष राकेशकुमार प्रजापती, सचिव महेश पवार, सहसचिव संभाजी यादव, खजिनदार दत्तात्रय कदम, सदस्य सचिन भोसले, राकेश दाभोळकर, संदीप सुर्वे, अजित वाडकर, रियाज खेरडकर, सोहम दाभोळकर, शरद पवार, विकास पवार यांच्यासह जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. दिशा दाभोळकर विशेष प्रयत्न करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button