टेरव देवस्थानचे होणार सुशोभीकरण प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत ७८ लाख १२ हजार निधी मंजूर.

चिपळूण – तालुक्यातील टेरव देवस्थान परिसराचे शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ७८ लाख १२ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. आमदार शेखर निकम यांनी टेरव देवस्थान येथील विकास कामांसाठी निधी मंजूर करुन घेतला आहे. या साठी ग्रामपंचायत टेरव यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभले आहे.
चिपळूणपासून ८ किमी अंतरावर निसर्गरम्य परिसरात टेरव येथे भवानी वाघजाई मातेचे मंदिर आहे. मंदिरात उत्तम शिल्पकलाकृती पाहता येते. मंदिरात कुलदैवत भवानीमाता आणि ग्रामदैवत वाघजाई मातेसह नवदुर्गेच्या आकर्षक मूर्ती आहेत.
शासनाच्या क वर्ग पर्यटन व ब वर्ग तीर्थक्षेत्रात या मंदिराचा समावेश आहे. नवसाला पावणारे देवस्थान अशी या देवस्थानची ख्याती आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून अनेक भक्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. भवानी वाघजाई देवीचा नवरात्र उत्सव येथे मोठ्या थाटात साजरा केला जातो. शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२२-२३ अंतर्गत श्री भवानी वाघजाई मंदिर टेरव येथील पर्यटन विषयक कामांसाठी ७८ लाख १२ हजार इतक्या रक्कमेला पर्यटन विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. शासन निर्णयान्वये १५ लाख ६२ हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रादेशिक पर्यटन योजनेला गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली आणि काही कामांना मंजुरी दिली. त्या कामांचे प्रस्ताव तातडीने पाठवण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना केली आहे. त्यामुळे टेरव येथील देवस्थान परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी उर्वरित निधीसह मंजूर झालेला निधी प्राप्त होणार आहे.



