प्रशासकीय अधिकारी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या लोकप्रतिनिधींची मिलीभगतीने जलजीवन योजनेत शासनाच्या कोट्यावधींचा चुराडा ; संगमेश्वर भाजपा अध्यक्ष प्रमोद अधटराव यांचा आरोप

देवरुख – “जलजीवन अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवण्याचा संकल्प केला. देशात कोट्यावधींची कामे मंजूर करून ही योजना राबविला जातआहे. जलजीवन मिशनच्या कामांमध्ये असणाऱ्या राजकीय हस्तक्षेप दूर करून प्रशासकीय अधिकाऱ्यांची कानउघडणी करून संगमेश्वर तालुक्यात होणारा कोट्यावधींचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी केली “
रत्नागिरी जिल्ह्यात खासकरून संगमेश्वर तालुक्यात या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या कोट्यावधींचा अक्षरशः चुराडा होत आहे ही बाब खेदजनक असून प्रशासकीय अधिकारी आणि त्यांना सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी यांची असंवेदनशीलता दर्शवणारी आहे.अशी आरोप अधटराव यांनी केला. मुळात केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित होत असतानाही स्वतःचे राजकीय वजन वापरून तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांच्या बैठका घेणारे माजी आमदार व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सुरुवातीच्या काळात असे वावरत होते जणू काही तालुक्यातील लोकांची तहान भागवण्यासाठी काम करत आहेत. मात्र त्यात असणारे राजकारण आता उघड होत आहे.
प्रत्येक ठेकेदाराची काम करण्याची आर्थिक क्षमता म्हणजेच बीड कपॅसिटी निर्धारित असते. मात्र तालुक्यातील कामांचे वाटप पहाता जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता याबाबत उदासीन असल्याचे दिसते. . प्रमोद महाडिक यांच्या रामवरदायिनी कन्स्ट्रक्शन आस्थापनेला फक्त संगमेश्वर तालुक्यातील २८ कामे मिळाली असून त्यांची रक्कम आहे ३८.०९ कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त या आस्थापनाला जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील कामे मिळाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरे ठेकेदार आहेत मानस जागुष्टे यांच्या नावावर एकूण १५ कामे असून रक्कम १२.५३ कोटी रुपये आहे.ऋत्विज किशोर घाग यांच्याकडेही १४ कामे आहेत आणि जवळपास ११.५७ कोटी रुपये निधी उपलब्ध आहे. तसेच अन्य अनेक ठेकेदारांनाही अशाच पद्धतीने कामांची खिरापत वाटण्यात आली आहे. एक ठेकेदार एकाच वेळी एवढी कामे करू शकत नसल्याने या कामांसाठी अनधिकृतपणे पोटठेकेदार नेमले गेले आहेत. ते ही काही राजकारण्यांचे सगे सोयरेच आहेत. त्यामुळे कामकाजाची गती आणि गुणवत्ता यांचा दर्जा अपेक्षेपेक्षा कितीतरी पटींनी कमी असणार. याबाबत सर्व माहिती हाताशी असूनही उपअभियंता मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा खेळ मांडून त्यांच्या बाजूने असलेल्या ठेकेदारांच्या गटाला कामे मिळवून देण्यासाठी चंग बांधला आणि त्याचा परिणाम म्हणून आज संगमेश्वर तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. याला जबाबदार असणारे जसे श्रेय घेताना सर्वांच्या समोर आले तसे यावेळी समोर येऊन अपयश स्वीकारतील का? असा सवालही अधटराव यांनी उपस्थित केला.
केंद्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून कामे करीत आहे. मात्र या पैशांचा दुरुपयोग स्थानिक राजकारण्यांनी प्रशासनाला हाताशी धरून केल्याने लोकांना अपेक्षित लाभ मिळाला नाही. अनेक गावांमध्ये आजही ‘जलस्वराज्य’ चांगल्या प्रकारे सक्रीय असतानाही या नवीन योजनेच्या निधीची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ चक्रावणारी आहेत.” त्यामुळेच त्यात भ्रष्टाचार होत आहे असे अधटराव यांनी सांगितले
एकेका ठेकेदाराकडे असलेले एक काम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ५ ते ६ महिन्यांचा कालावधी सहज जातो. अशात १४-१५ आणि काहींची २८ कामे करण्यासाठी अनधिकृत मार्गाने पोटठेकेदार नेमून योजनेच्या मूळ उद्देशांना हरताळ फासण्यात येत आहे. अशाने सर्व कामांची पूर्तता होण्यासाठी साधारणपणे ३ ते ५ वर्षे सहज निघून जातील. काम पूर्ण झाल्यावर देयके संबंधित ठेकेदार स्वीकारतील मात्र त्यानंतर कामांचे उत्तरदायित्त्व स्वीकारणार कोण? हा प्रश्न प्रशासनिक अधिकारी का दुर्लक्षित करतात तेच कळत नाही. यासंदर्भात आम्ही केंद्रसरकारकडे गांभीर्यपूर्वक पत्रव्यवहार करत आहोत. विकासकामांत अडथळा न आणण्याची आमची भूमिका आहे. मात्र आता डोक्यावरून पाणी चालले आहे.. यामुळे केंद्रीय मंत्र्याकडे या गैरव्यवहाराचा संपूर्ण लेखाजोखा मांडून निधीच्या गैरवापराचा आणि कामाच्या गती व गुणवत्तेचा उडालेल्या बोजवाऱ्याची पोलखोल करणार” असल्याचे प्रमोद अधटराव यांनी सांगितले .
जवळपास २०० कोटी रुपये या योजनेसाठी संगमेश्वर तालुक्याला मिळाले आहेत. ही रक्कम जिल्हा नियोजनाच्या एका सत्रापेक्षाही मोठी आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचा फार्स करून योजना रेटून नेली आहे. अनेक ग्रामस्थ याबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी व्हावी ही मागणी करण्यापूर्वी मी सहकाऱ्यांना १सोबत घेऊन संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. पाणवठा व पुरवठा कामांची स्थिती प्रत्यक्ष पहाणी करून अहवाल तयार करून मंत्रीमहोदयांना सादर करणार आहेत असे सांगून. याप्रकरणी तालुक्यातील ग्रामस्थांच्या तक्रारींचा स्वतंत्र अहवालही सादर केला जाईल. भारतीय जनता पार्टी, संगमेश्वरच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी अशा नागरिकांना संपूर्ण सहकार्य केले जाईल. यात कोणीअगदी भाजपाचा पदाधिकारी जरी असला तरी मी अशाप्रकारे गैरमार्गाने होणाऱ्या कामांची माहिती लोकांनी पुढे येऊन देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
लोकांच्या न्याय्य आणि शाश्वत विकासासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी कटिबद्ध आहे.”असे हि त्यांनी शेवटी सांगितले



