शिक्षक उमेश पांडुरंग डावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

साखरपा – साखरपा केंद्र शाळा नंबर १ येथील शिक्षक उमेश पांडुरंग डावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
२०२३ ह्या वर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा सोमवारी शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली. साखरपा नंबर १ ह्या शाळेतील शिक्षक उमेश पांडुरंग डावरे यांची संगमेश्वर तालुक्यातून ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. २००७ सालापासून डावरे हे शिक्षकी पेशात आहेत. २०१९ पासून ते केंद्रशाळा साखरपा येथे सेवा देत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात डावरे यांनी शिक्षणात खंड पडू न देता शिक्षणगंगा घरोघरी ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सातत्याने प्रबोधन केले. गेल्या तीन वर्षात सुमारे ३० हजार रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचा उठाव केला आहे. त्याच प्रमाणे प्रिंटर, प्रोजेक्टर, शालेय भौतिक सुविधा, बोलक्या भिंती, बगीचा अशा उपक्रमात त्यांनी सातत्याने सहभाग घेतला आहे.
उमेश डावरे यांनी सामाजिक कार्यातही सातत्याने सहभाग दाखवला आहे. कोरोना काळात त्यांनी मुर्शी चेक पोस्ट इथे पोलीसमित्र म्हणून सेवा केली. साखरपा क्वारंटाईन सेंटरइथेही त्यांनी सेवा बजावली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी डाटा एन्ट्रीचे कामं केले. कोल्हापूर इथे आलेल्या महापुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी त्यांनी मोठा हातभार लावला होता.
शाळेतून स्पर्धा परीक्षकांना ते सातत्याने मार्गदर्शन करताना. उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीतही त्यांनी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत. तसेच शाळेत राख्या करून त्या सीमेवर पाठवतात. ह्याशिवाय विज्ञान प्रदर्शनात सलग तीन वर्षे त्यांनी प्रथम क्रमांक मिळवले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षात सातत्याने शाळेला यश मिळवून दिले आहे. इंग्रजी विषयात टॅग कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी काम केले आहे.
डावरे हे स्वतः कवी आहेत. त्यांच्या कवितांचा बालकव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
डावरे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल शिक्षण विभागातून, साखरपा पंचक्रोशीतून त्यांचे मोठे अभिनंदन करण्यात येत आहे.



