येडगेवाडीत ६० हजार लिटर पाणी असल्याचे सांगत पाणी पुरवठा अधिका-यांकडून जनतेची दिशाभूल ; रस्ता प्रकरणानंतर पाण्यासाठी पुन्हा येडगेवाडीची फरपट सुरु

संगमेश्वर – तालुक्यातील येडगेवाडीसाठी जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी शाश्वत पाणी पुरवठा करणारी विहीर असावी असे स्थानिकांचे मत आहे तशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता यांना दिले आहे मात्र अधिकारी जनतेची दिशाभूल करुन येडगेवाडीतील विहीरींनी ६० हजार लिटर पाणी असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल होत असून पाणी पुरवठा आधिका-यांनी येडगेवाडीती विहीरीची प्रत्यक्ष पाहणी करुन पाणी पातळीचा अभ्यास करुन अभ्यासपुर्ण मत नोंदवणे आवश्यक आहे.
येडगेवाडी नळपाणी पुरवठा योजनांसाठी राजिवली बौध्दवाडी या ठिकाणी शाश्वत पाणीसाठा असल्याचे पत्र राजिवली ग्रामपंचायतीने आमदार शेखर निकम आणि जिल्हा परीषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे तर ग्रामपंचायतीच्या पत्राचा संदर्भ लक्षात घेवून आमदार शेखर निकम यांनी पाणी पुरवठा विभागाला पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.आमदार शेखर निकम, राजिवली ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांची शाश्वत पाण्याची मागणी असताना अधिकारी मनमानी करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत आणि आमदारांच्या मागणीलाही आव्हान देत आहेत.
येडगेवाडीची सध्याची लोकसंख्या १ हजारांहून अधिक आहे. सध्याची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक माणसाला ५५ लिटर पाणी देय आहे. शासनाचा निकष लक्षात घेतला तर १ हजार लोकसंख्येला ५५ हजार लिटर पाण्याची गरज आहे. येडगेवाडीतील विहीरीत २४ तासात ५५ हजार लिटर पाणीसाठा उपलब्ध होवू शकतो का ? त्याची तपासणी करण्याची मागणी संतोष येडगे यांनी पाणी पुरवठा अधिका-यांकडे केली आहे.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी येडगेवाडीतील गोरगरीब जनतेची दिशाभूल करणा-या स्वयंभू नेत्याने परिस्थिती लक्षात घेवून पुढाकार करावा अन्यथा तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. येडगेवाडीची दिशाभूल करुन अधिका-यांना चुकीच्या पध्दतीने निवेदन दिले आहे.येडगेवाडील सर्वांची सहमती लक्षात घेणे आवश्यक आहे. येडगेवाडीतील सर्व नागरीकांची सहमती न घेताच हे निवेदन दिले आहे.जे निवेदन दिले आहे ते चुकीचे असून येडगेवाडीला मुबलक पाणी हवे आहे. सर्व येडगेवाडीचे हित कशात आहे याची खात्री न करताच भुमिका मांडणे हे चुकीचे ठरणार आहे. रस्ता प्रकरणात येडगेवाडी आणि घाडगेवाडीची निराशा करणा-या स्वयंभू नेत्याने नळपाणी योजना कामात टांग टाकून जनतेची फरपट करण्याचे ठरवले आहे.येडगेवाडी नळपाणी योजना कामात स्वयंभू नेत्याने जनतेची दिशाभूल करु नये. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांनी येडगेवाडी नळपाणी पुरवठा योजना कामातील वास्तूस्थिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी संतोष येडगे यांनी पाणी पुरवठा अधिका-यांकडे केली आहे.
– संतोष येडगे
– माजी उपसरपंच ,ग्रामपंचायत राजिवली, ता.संगमेश्वर
येडगेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेसाठी नवीन विहीर खोदली आहे. त्या कामाच्या ठेकेदाराकडून त्या विहीरीची सध्याची पाणी पातळी तपासण्यात येईल २४ तासातील पाणीसाठा आणि उपसा याचे गणित मांडावे लागेल त्यानंतर वरीष्ठांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल. त्या विहिरीची पाणी पातळी तपासण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
– आर.एल. लठाड
– उप अभियंता, ग्रा.पा.पु उप विभाग संगमेश्वर ( देवरुख )



