आपला जिल्हा

आरवली-कुंभारखाणी परिसरात बिबट्यांची दहशत; रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पाळीव कुत्र्याचा बिबट्याने घरासमोरच केला फडशा; वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

आरवली  : संगमेश्वर तालुक्यातील आरवली, कुंभारखाणी बु., कुचाबे, राजिवली, मुरडव आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटे दिवसाढवळ्याही तसेच रात्रीच्या वेळी कुत्रे, मांजरे, गुरे व वासरांवर हल्ले करत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

कुंभारखाणी बु. परिसरातील काही खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबटे आपल्या पिल्लांसह फिरताना कैद झाले आहेत. त्यामुळे परिसरात एक नव्हे तर अनेक बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी श्री. विजय सुर्वे यांच्या गुरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच श्री. अविनाश प्रताप यांच्या वासराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

माजी सभापतींच्या घरासमोर थरारक घटना

काल मध्यरात्री सुमारे १.४५ वाजता आरवली येथे माजी सभापती श्री. विकास सुर्वे यांच्या घरासमोर बिबट्याने त्यांच्या पाळीव ‘देवा’ नावाच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.

घराच्या बाहेरील खुर्चीत झोपलेल्या कुत्र्याचा किरकोळ आवाज ऐकू आल्यानंतर सौ. शलाका सुर्वे यांनी खिडकीचे स्लायडिंग उघडले. त्याचवेळी श्री. विकास सुर्वे यांनी घराबाहेरील दिवा लावला. प्रकाशात बिबट्या आणि कुत्र्यामध्ये सुरू असलेली झटापट त्यांनी प्रत्यक्ष पाहिली.

कुटुंबीयांनी दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुतण्या ओंकार तसेच शेजारी श्री. महेश शिर्के व सौ. पल्लवी शिर्के हेही बाहेर आले. मात्र तोपर्यंत बिबट्याने कुत्र्याला जबड्यात पकडले होते. नागरिक बाहेर येत असल्याचे लक्षात येताच बिबट्याने कुत्र्याला घेऊन घरालगतच्या बांधावरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

स्ट्रीट लाईट बंद असल्याने धोका वाढला

विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांपासून परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य आहे. यामुळे बिबट्यांना मानवी वस्तीजवळ शिकार करण्यासाठी अधिक पोषक वातावरण मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

जंगलतोडीमुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होण्याची भीती

वनक्षेत्रातील अनधिकृत अथवा बेकायदा जंगलतोड, वन्यप्राण्यांची नष्ट होणारी अधिवासस्थाने आणि बिघडलेली जैवसाखळी यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. बिबट्यांसोबतच कुंभारखाणी बु. परिसरात गवे-रेडे यांचाही वावर वाढल्याचे नागरिक सांगतात.

वन्यप्राणी मानवी वस्तीत वारंवार येत असल्याने भविष्यात एखाद्या घराच्या भिंतीला किंवा दरवाजाला धडक देऊन नुकसान होणे अथवा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जैवसाखळी जपणे ही सर्वांची जबाबदारी

“वनखात्याकडे केवळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करून प्रश्न सुटणार नाही. प्रत्येकाने जैवसाखळी अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी बेकायदा जंगलतोड थांबविणे आणि त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे,” असे मत श्री. विकास सुर्वे यांनी व्यक्त केले.

वनविभागाने परिसरात तातडीने गस्त वाढवावी, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावावेत, नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे तसेच बंद असलेल्या स्ट्रीट लाईटची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button