धामणी पं. स. गणातून आपतर्फे निवडणूक लढवणाऱ्या सुजीत सुर्वे यांचा देवरूख येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
देवरूख तहसील कार्यालयात अर्जांची छाननी असल्याने आले असता कार्यालयाबाहेर छातीत जोरदार आली कळ

देवरूख – संगमेश्वर तालुक्यातील धामणी पं. स. गणातून आपतर्फे निवडणूक लढवणाऱ्या कुंभारखणी बुद्रुक येथील सुजीत गणपत सुर्वे (वय-५७) यांचा आज गुरूवारी सकाळी देवरूख येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा होता. त्यानंतर गुरूवारी आजपर्यंत आलेल्या सर्व अर्जांची देवरूख तहसीलदार कार्यालयात छाननी प्रक्रिया होती. यासाठी सुजीत सुर्वे हे देवरूख तहसीलदार कार्यालयात येत असतानाच पोर्चबाहेरच त्यांच्या छातीत जोरदार कळ येवून ते खाली पडले. त्यांना त्वरीत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डाँक्टर तपासणी करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तपासणीअंती डाँक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचे मावस भाऊ अनिल सुर्वे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संतोष थेराडे, मुन्ना थरवळ, इस्त्याक कापडी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ वाजे, आषिश सुर्वे व अन्य सहकारी यांनी मदत केली. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. सुजीत सुर्वे यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. त्यांची पत्नी, मुले यांचेसह सर्व नातलग मुंबईत असल्याने त्यांचे पार्थिव मुंबई येथे नेण्यात आले आहे.



