मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केली आकाश मार्गिकेची पाहणी

मुंबई – वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे – कुर्ला संकुल (BKC), म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये – जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आकाश मार्गिकेचे (Sky Walk) बांधकाम पूर्ण झाले आहे. ही आकाश मार्गिका नागरी सेवेसाठी सज्ज असून वापरासाठी लवकरच खुली करण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी काल (दिनांक २२ जानेवारी २०२६) या आकाश मार्गिकेची प्रत्यक्ष पाहणी केली.
वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शन पर्यंतची नवीन आकाश मार्गिका एकूण ६८० मीटर लांबीची व सरासरी ५.४० मीटर रूंदीची आहे. पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी ४ जिने आहेत. सुलभ मार्गक्रमण करण्यासाठी २ स्वयंचलित सरकत्या जिन्यांची (Escalator) जोड आहे. सुरक्षितता आणि निगराणीसाठी १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे बांधणी करण्याचा मध्यरात्रीचा मर्यादित कालावधी, आकाश मार्गिकेच्या खालील अनंत काणेकर रस्त्यावरील पादचा-यांची वर्दळ यामुळे आकाश मार्गिका उभारताना विशेष काळजी घ्यावी लागली. तसेच, उपयोगिता वाहिन्यांचे स्थलांतर अशी विविध आव्हाने असून देखील आकाश मार्गिकेचे काम निर्धारित कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. हे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे होते.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी म्हणाले की, वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) ते म्हाडा कार्यालय, पश्चिम पूर्व महामार्ग, वांद्रे न्यायालय, वांद्रे – कुर्ला संकुलच्या वाणिज्यिक परिसरातील कार्यालयांमधून मार्गक्रमण करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी ही आकाश मार्गिका उपयुक्त ठरणार आहे. थेट रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे रस्ता ओलांडण्यासाठी उपलब्ध सुविधेमुळे पादचारी या आकाश मार्गिकेचा वापर करतील. त्यामुळे अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल. आकाश मार्गिकेचे बांधकाम पूर्ण झाले असून संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, सुरक्षा प्रमाणपत्र तसेच आकाश मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना – हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. पुनर्बांधणी करण्यात आलेली आकाश मार्गिका खुली करण्यास सज्ज आहे, असे श्री. गगराणी यांनी नमूद केले.
या पाहणी दौ-याप्रसंगी प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते उपस्थित होते.



