आपला जिल्हा

जलजीवन मिशन नपापू योजना ! येडगेवाडी गावठाणात विहीसाठी मुबलक पाण्याचा नैसर्गिक उदभव स्रोत उपलब्ध नसल्याचा भूजल सर्वेक्षणातून निष्कर्ष

येडगेवाडी नळपाणी योजनांसाठी राजिवली बौध्ववाडी जवळील दिंड्याच्या प-यात मुबलक पाणी उपलब्ध त्या ठिकाणी योजना राबविण्याच्या भूजल अधिकाऱ्यांच्या सूचना

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग संगमेश्वर ( देवरुख ) उपअभियंता अभिजीत कांबळे, भूजल सर्वेक्षण विभागाचे श्री. पोळ यांनी दि. १० डिसेंबर २०२५ रोजी येडगेवाडीतील जलजीवन मिशन अंतर्गत उद्भव स्त्रोतांची पाहणी केली यावेळी पाहणी दरम्यान येडगेवाडी येथील कोणत्याही विहीरीत संपूर्ण येडगेवाडीला पुरेल इतका मुबलक पाणीसाठा नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. जलजीवन मिशन योजनेसाठी खोदकाम केलेली येडगेवाडी तिवटी येथील विहीर बुजवण्याच्या सूचना यावेळी भूजल अधिकाऱ्यांनी दिल्या.

येथील योजना राबविताना त्या ठिकाणी विहीरीला मुबलक पाणी उपलब्ध असावे अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी आहे.जलजीवन मिशन अंतर्गत येडगेवाडी ला मुबलक पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी पाण्याची विहीर करावी या मागणीसाठी येडगेवाडी ग्रामस्थ मागील दोन वर्ष शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्हाधिकारी, रत्नागिरी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उप विभाग ( संगमेश्वर ) व भूजल विभाग, रत्नागिरी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत दोन ग्रामसभा घेवून येडगेवाडीला शासनाच्या मापदंडानुसार प्रती माणूस ५५ लिटर या प्रमाणे येडगेवाडीची सध्याची लोकसंख्या ६४४ असल्याने ३५ हजार ४२० लिटर पाणी दररोज उपसा करता येईल या क्षमतेच्या विहिरीची मागणी केलेली आहे. येडगेवाडी गावठाणात खोदलेल्या विहिरीत यील्ड टेस्ट केली असता त्या ठिकाणी सर्वांना पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध नाही त्यामुळे योजना राबविण्यात येताना मुबलक पाणी मिळेल अशा ठिकाणी विहीर करावी या मागणीवर येडगेवाडी ग्रामस्थ ठाम असून नियमबाह्य योजना राबविण्यास येडगेवाडीतील ग्रामस्थांनी वारंवार विरोध केला आहे.

येडगेवाडी नळपाणी योजना ही सर्व येडगेवाडीकरांसाठी असून या योजनेचा लाभ संपूर्ण येडगेवाडीला होणार आहे. या योजनेची लाभार्थी संपूर्ण येडगेवाडी असून योजना राबविताना येडगेवाडीतील सर्वांना विश्वासात घेवू काम करावे अशी विनंती संतोष येडगे यांनी या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली तर येडगेवाडीतील मुंबई, पुणे आणि स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्त बैठक घेवून योजनेबाबत आवश्यक ती माहीती ग्रामस्थांना देवून सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या योजनेचा नारळ फुटून कामाचा शुभारंभ करावा अशी विनंती यावेळी संतोष येडगे यांनी केली आहे. या पाहणी दौऱ्यावेळी भूजल सर्वेक्षण विभागाचे श्री. पोळ , ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ( संगमेश्वर ) उप अभियंता श्री. अभीजीत कांबळे, शाखा अभियंता श्री. इंदुलकर, माजी उपसरपंच संतोष येडगे, माजी उपसरपंच तुकाराम येडगे, ग्रामपंचायत सदस्य रमेश येडगे, विठ्ठल येडगे, धोंडीबा येडगे, बारकू येडगे, रामचंद्र गंगाराम येडगे, रामचंद्र बाबू येडगे, लक्ष्मण येडगे, नामदेव येडगे, भास्कर येडगे, गणपत येडगे, हरीचंद्र येडगे, रामचंद्र येडगे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button