आपला जिल्हा

चिपळूणच्या फुलपाखरू उद्यानात फुलपाखरा ऐवजी फिरतायत गुरे

चिपळूण – शासनाच्या माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर परिषदेने चिपळूण शहरातील काविळतळी येथे गतवर्षी साकारलेल्या फुलपाखरू उद्यानात आता पाखरांऐवजी जनावरांचा वावर दिसून येत आहे. या उद्यानाची इतकी वाताहात झाली आहे की येथे उद्यान होते की माळरान असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. यामुळे नगर परिषदेचे हजारो रुपये वाया गेले आहेत.

गतवर्षी मोठा गाजावाजा करीत नगर परिषदेने शासनाच्या माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर यांनी शहरातील काविळतळी येथील आरक्षित असलेल्या १० हजार स्क्वेअर फूट जागेत फुलपाखरू उद्यान साकारले. हजारो रुपये खर्च करीत फुलपाखरांना आकर्षित करणारी सुमारे १ हजार झाडे येथे लावण्यात आली होती. या उद्यानाचे २५ फेब्रुवारी रोजी थाटामाटात उदघाटन करण्यात आले. या उद्यानात नागरिकांना विविध प्रकारची फुलपाखरे बघण्याची संधी मिळेल असे जाहीर करण्यात आले.
नगर परिषदेच्या या वेगळ्या उपक्रमाचे मोठे कौतुकही झाले. उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदार पद्धतीवर घेतलेल्या कर्मचार्‍यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. मात्र त्याची देखभाल योग्य रीतीने न झाल्याने सध्या उद्यान परिसरात केवळ गवत वाढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button