जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बोरपाडळे व आरळे येथील तुती लागवड व रेशीम प्रक्रिया उद्योग केंद्रास भेट

कोल्हापूर – बोरपाडळे ता. पन्हाळा येथील रेशीम उत्पादक शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या तुती बागेस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगातून जास्तीत जास्त उत्पन्न घेवून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार माधवी शिंदे, बी.डी.ओ. सोनाली माडकर, वरिष्ठ तांत्रिक सहायक पी.जी. निकम, क्षेत्र सहायक प्रियंका चंदनशिवे आदी उपस्थित होते.
तसेच आरळे ता. पन्हाळा येथील अभिजीत घाटगे यांच्या रुक्मिणी दत्त रेशीम प्रक्रिया उद्योग केंद्रासही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी भेट देवून उद्योगाची पाहणी केली. श्री. घाटगे यांनी नाविन्यपूर्ण उद्योगाची उभारणी करुन जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोष विक्री केंद्र उपलब्ध केले. जिल्ह्यातील उत्पादीत रेशीम कोष जिल्ह्यातच खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री. घाटगे यांचे विशेष कौतुक करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. घाटगे यांच्या ऑटोमॅटीक रिलींग मशिन युनिट (ARM) साठी शासनाने नुकतेच त्यांना रु. 1.12 कोटीचे अनुदान सिल्क समग्र 2 या योजनेतून दिले असून या उद्योगाचा जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.



