आपला जिल्हा

ऐरोली नाटयगृहाच्या कामाच्या प्रत्यक्ष पाहणीअंती कामात गतीमानतेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली से.5 येथे भूखंड क्र.37 वर बांधण्यात येत असलेल्या नुतन नाटयगृहाच्या सुरु असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत नवीन वर्षाच्या प्रारंभी काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणीअंती दिले. या प्रसंगी आयुक्तांसमवेत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता श्री. संजय पाटील व संबधित अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथे विष्णुदास भावे नाटयगृह असून कला व संस्कृतीप्रेमी रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद लक्षात घेउुन ऐरोली येथे नवीन नाटयगृह उभारण्याचे काम सुरु आहे.

860 आसन क्षमतेचे हे नाटयगृह 4 मजली उंचीची असून या ठिकाणी पहिल्या व दुस-या बेसमेंटमध्ये चार चाकी व दुचाकी वाहन तळाची व्यवस्था आहे.

याठिकाणी तळ मजल्यावर काही भाग वाहनतळाचा असून मुख्य प्रवेशव्दारावर स्वागत कक्ष, तिकिट बुकींग कार्यालय, फुड काउुंटर, प्रशासकीय दालन, भांडार गृह तसेच नाटय साहित्याची ने – आन करण्याकरीता स्वतंत्र प्रवेशव्दार आहे.

पहिल्या मजल्यावर रंगमंच तसेच प्रेक्षागृहात 478 आसन व्यवस्था आणि ध्वनी नियंत्रण कक्ष व रंगीत तालीम कक्ष आहे.

दुस-या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, 382 आसन व्यवस्था, भांडार कक्ष व महिला कलाकारांसाठी रंगभुषा कक्ष आहे.

तिस-या मजल्यावर पुरुष रंगभुषा कक्ष, ध्वनी / प्रकाश नियंत्रण कक्ष व्यवस्था आहे.

चौथ्या मजल्यावर विशेष अतिथी कक्ष, कलाकारांच्या सुविधांकरीता कक्ष अशी व्यवस्था आहे.

या नाटयगृहामध्ये सहा प्रवासी उद्वाहक आणि एक हायड्रोलिक उद्वाहक व्यवस्था आहे.

या बांधकामाची संपूर्ण पाहणी करुन येथील कामाच्या प्रगतीचा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईनी आढावा घेतला. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वास्तुविशारदांनी केलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण पाहून आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे साधारणत: 65 टक्के काम पूर्ण झाले असून या कामाची गुणवत्ता राखत कामाला गती द्यावी व नवीन वर्षाच्या प्रारंभापर्यंत काम पूर्ण करण्याचे कालबध्द नियोजन करावे असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button