आरवली – येडगेवाडी मार्गावरील कुचांबे कॅालनी ते धनगराचे पाणी पर्यंतचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केलेल्या देखभाल दुरुस्ती निधीतून तात्पुरती दुरुस्ती करा.

संगमेश्वर – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४४ हा रस्ता कि.मी १७ कुचांबे कॅालनी ते २३ धनगराचे पाणी पर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडून रस्ता धोकादायक बनला आहे. दुचाकीसाठी हा मृत्यूचा सापळा बनला आहे. हा मार्ग सध्या चारचाकी वाहनांसाठी नादुरुस्तीचे कारण बनत चालला आहे. या मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ या कालावधीसाठी ₹१२९६.०५ कोटी निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केलेल्या देखभाल दुरुस्ती निधीतून आरवली – येडगेवाडी प्रजिमा ४४ या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती व्हावी अशी विनंती स्थानिकांकडून होत आहे.



