संगमेश्वर – पाटण घाटमार्गासाठी खासदार रविंद्र वायकर यांना पत्र ; रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील ४ लाख जनतेची गैरसोय दूर होणार
दिल्लीतील अधिवेशनात घाटमार्ग लक्षवेधी ठरावा संगमेश्वर - पाटण घाटमार्ग समन्वयक समितीची खासदार वायकर यांना विनंती

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्याला पश्चिम महाराष्ट्रासोबत जोडण्यासाठी संगमेश्वर – संगमेश्वर पाटण घाटमार्ग वरदान ठरणार असून या घाटमार्गामुळे संगमेश्वर बाजारपेठेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. या घाटमार्गासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी पुढाकार घेवून दिल्लीत केंद्र सरकारचे लक्ष वेधावे अशी विनंती घाटमार्ग समन्वयक समिती चे समन्वयक संतोष येडगे यांनी केली आहे.
मुंबई उत्तर – पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख कामे झाली आहेत त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत संगमेश्वर ( कसबा ) येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे नुतनीकरण आणि जिल्ह्यातील शहरी भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवणे इत्यादी कामे पुर्णत्वास गेली आहेत. खासदार रविंद्र वायकर यांचा संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आणि रत्नागिरी जिल्ह्याप्रती असणारे प्रेम पाहता ते संगमेश्वर – पाटण घाटमार्गासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करतील आणि घाटमार्ग मंजूर करुन घेतील असा विश्वास संतोष येडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
खासदार रविंद्र वायकर चिपळूण दौऱ्यावर आले होते त्यावेळी संतोष येडगे यांनी त्यांच्या खेड येथील निवासस्थानी भेट घेवून संगमेश्वर – पाटण घाटमार्ग विषयी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती खासदार वायकर यांनी त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संगमेश्वर – पाटण घाटमार्गाची सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना संतोष येडगे यांना केली होती त्यानुसार संतोष येडगे यांनी खासदार रविंद्र वायकर यांना पत्र लिहून संगमेश्वर – पाटण घाटमार्गाची माहीती सादर करुन पुढील कामासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
संगमेश्वर ते चाफेर ( पाटण ) हा एकूण ४६.६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासन दरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे समन्वयक संतोष येडगे यांनी सांगितले.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग डीपीआर साठी महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. डीपीआर साठी तरतूद केलेल्या निधीसाठी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
संगमेश्वर पासून सुरु होणा-या या घाटमार्गाचा कोसुंब,करंबेळे, वाशी,धामणी ,तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग , चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे,नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे, आदी आणि खाडीपट्ट्यातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परीसरातील गावांमधील लाखो नागरीकांना या मार्गाचा फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे हा रस्ता पुर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे भूमिपूजन १९९९ मधील युती सरकारच्या काळात झाले होते. सुदैवाने आता युती सरकार सत्तेत आहे आणि याच सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प पुर्ण व्हावा अशी इच्छा आहे. या घाटमार्गासाठी दोन्ही जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अघिक जनता आग्रही आहे.



