राजिवली, रातांबी ! लोकशाहीत मतदान उत्सव म्हणून साजरा व्हावा – गटविकास अधिकारी श्री. भरत चौगुले
राजिवली, रातांबी मतदान केंद्रावरील टक्केवारीवाढी साठी प्रशासनाकडून जनजागृती

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली, रातांबी मतदान केंद्रावरील लोकसभा निवडणुकीतील टक्केवारी घसरल्याने राजिवली आणि रातांबी ही दोन्ही मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्राच्या यादीत गेली या दोन्ही केंद्रांवर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदारांनी सहभागी होवून होळी आणि गणेशोत्सव सणासारखाच आपला लोकशाही च्या मतदान उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या मतदान केंद्रावरील टक्केवारी वाढवावी असे आवाहन संगमेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी तथा तालुका आचारसंहिता प्रमुख श्री. भरत चौगुले यांनी केले.

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत राजिवली मतदान केंद्रावर सरासरी ४० टक्के तर रातांबी केंद्रावर ३५ टक्के मतदान झाले होते. ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेली जिल्ह्यातील मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील राजिवली आणि रातांबी मतदान केंद्रांचा समावेश असल्याने या दोन केंद्रांवरील मतदान टक्केवारीचा आढावा घेण्यात आला. संतोष येडगे यांनी या बैठकीत विश्लेषण मांडताना म्हणाले की राजिवली आणि रातांबी केंद्राअंतर्गत येणाऱ्या मतदारांना स्थानिक पातळीवरील शाश्वत रोजगार नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात शहरात स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. मात्र आपल्या गावाच्या विकासाप्रती निष्ठा बाळगून चाकरमानी या लोकशाही च्या उत्सवात सहभागी होवून गावातील मतदानाचा घसरलेला टक्का वाढविण्यासाठी पुढाकार घेतील. विधानसभा निवडणुकीत आपल्या गावाचे संवेदनशील यादीतील नाव वगळण्यासाठी चाकरमानी पुढाकार घेतील असा विश्वास या बैठकीत संतोष येडगे यांनी व्यक्त केला.
राजिवली, रातांबी या दोन केंद्रांचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी श्री भरत चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ नोव्हेंबर २०१४ रोजी रातांबी या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला संगमेश्वर पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री.घुले, राजिवली ग्रामपंचायत सरपंच सौ. दिपीका दिपक सावंत, माजी उपसरपंच श्री. संतोष येडगे, ग्रामविकास अधिकारी श्री. सुनिल जाधव, राजिवली पोलिस पाटील श्री. संदीप कदम, कुटगिरी पोलिस पाटील श्री. शांताराम निकम, श्री. दिपक सावंत, श्री. संजय पाटोळे, राजिवली बीएलओ श्री.सुभाष काळंबे, श्री. पांडुरंग येडगे,ग्रामपंचायत कर्मचारी श्री.दिपक घाडगे, अंगणवाडी सेविका सौ.सोनाली कदम आणि इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



