आरोग्य व शिक्षण

अधिसभेच्या निवडणुकीत युवासेनेची बाजी ; सर्व १० जागा जिंकल्या ; झोरे, सावंत यांची हॅट्रिक

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील १० नोंदणीकृत पदवीधर संघासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल शुक्रवार दिनांक २७ रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये ५ जागांसाठी खुल्या प्रवर्गातून प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले.

तर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज ( DT/NT) प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून मयुर पांचाळ आणि महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले.

नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी एकूण २८ उमेदवार उभे होते. २४ सप्टेंबर २०२४ रोजी एकूण ३८ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. या १० जागांच्या निकालासाठी दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी मतमोजणी पार पडली.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू प्राचार्य अजय भामरे आणि कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. निवडणूकीच्या कामी उपकुलसचिव (निवडणूक) विकास डवरे, सहाय्यक कुलसचिव रमेश दामसे आणि त्यांच्या चमुने अथक प्रयत्न घेतले. आज झालेल्या मतमोजणीसाठी प्रा. बी. के. साखळे, माजी कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, संजय लांब,अजित इंगळे आणि विष्णू नागरे यांच्यासह निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झालेले सर्व उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिवांसह सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

शशिकांत झोरे, प्रदीप सावंत यांची हॅट्रिक

खुल्या गटातील उमेदवार प्रदीप सावंत यांनी पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते घेऊन सलग विजयी झाले आहेत. तर राखीव गटातून शशिकांत झोरे यांनीही विजयाची हॅ्ट्रिक मारली आहे. व नवे चेहरेदेखील चमकले. सर्वांचे युवासेनाचे वरून सरदेसाई यांनी प्रतिक्रिया देताना अभिनंदन केले आहे.

कडेकोट बंदोबस्त , सिसीटीव्हीचा पहारा

या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच कडक बंदोबस्त व सीसीटिव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी पार पडली. यावेळी इमारतीच्या बाहेर पदपथावर यावसेना व अभाविप चे कार्यकर्त्यांची गर्दी बाहेर जमली होती.

निवडणुकीचा निकाल

राखीव प्रवर्ग –
डीटीएनटी:-
शशिकांत झोरे-युवासेना ५२४७ मते
अजिंक्य यादव -अभाविप १०६६ मते

एससी:-
शीतल देवरूखकर -युवासेना
५४८९ मते
राजेंद्र सायगावकर-अभिविप १०१४ मते

एसटी:-
धनराज कोहचाडे -युवासेना
५२४७ मते
निशा सावरा-अभाविप
९२४ मते

ओबीसी:
मयूर पांचाळ -युवासेना ५३५० मते
राकेश भुजबळ- अभिविप ८८८ मते

महिला:-
स्नेहा गवळी-युवासेना ५९९४ मते
रेणुका ठाकूर-अभाविप ८९३ मते

खुला प्रवर्ग:-
प्रदीप सावंत-युवासेना
१३३८ मते
मिलिंद साटम- युवासेना १२४६ मते
ॲड. अल्पेश भोईर – युवासेना ११३७ मते
परमात्मा यादव – युवासेना १०६४ मते
किसन सावंत- युवासेना ९७० मते

खुल्या प्रवर्गात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पाच तर चार अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र युवासेनेच्या पाचही उमेदवारांनी पहिल्या पसंतीची मते आणि विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत दणदणीत विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button