संतोष येडगे यांचे विषप्राशन आंदोलन ; पालकमंत्री उदय सामंत यांचे नियमानुसार काम करण्याचे जिल्हाधिका-यांना निर्देश ; आमदार शेखर निकम, अधिका-यांसोबत सकारात्मक चर्चा.
येडगेवाडी नळपाणी योजनेसाठी सौरपंपाचा वापर करुन विजबील टाळणार - गटविकास अधिकारी भरत चौगुले

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथील नळपाणी योजना नियमानुसार आणि संपुर्ण येडगेवाडीला मुबलक पाणी देणारी व्हावी त्यासाठी खोदण्यात येणा-या विहीरीला मुबलक पाणी मिळावे अशा मागणीचे १५६ ग्रामस्थांनी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते त्या निवेदनाचा संदर्भ घेवून संतोष येडगे यांनी १५ ॲागस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषप्राशन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. संतोष येडगे आणि राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ( AP ) जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे यांनी १४ ॲागस्ट २०२४ रोजी पालकमंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र औधोगिक विश्रामगृह रत्नागिरी या ठिकाणी भेट घेवून निवेदन देवून चर्चा केली त्या निवेदनावर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना येडगेवाडी नळपाणी योजना काम करताना ते नियमानुसार करावे असे निर्देश दिले आहेत.
जलजीवन मिशन मधून येडगेवाडी साठी १ कोटी ३७ लाख रुपये किंमतीची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. या योजनेच्या नियमानुसार प्रत्येक नागरीकाला ५५ लिटर पाणी देणे बंधनकारक आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येडगेवाडीची लोकसंख्या ५०९ आहे तर २०५३ ची संकल्पीत लोकसंख्या ९५९ होते. जलजीवन मिशन चा आराखडा हा पुढील ३० वर्षांचा असून लोकसंख्या नियमानुसार येडगेवाडीला दररोज ६३ हजार लिटर पाण्याची गरज आहे. सध्या जलजीवन मिशन योजनेसाठी खोदण्यात आलेल्या तिवटी येथील विहीरीत दररोज ३५०० लिटर पाणी येत असल्याचा अहवाल पाणी पुरवठा विभागाने कनिष्ठ भूवैज्ञानिक यांना कळवलेला आहे. गरज ६३ हजार लिटर पाणी आणि उपलब्ध पाणी ३५०० असल्याने येडगेवाडी ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवत हे काम अनियमित पध्दतीने होत असल्याचे निवेदन जिल्हा परीषद मुख्य कार्याकारी अधिकारी यांना दिलेले होते.येडगेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार संतोष येडगे स्वातंत्र्यदिनानिमित्त विषप्राशन आंदोलनाचा इशारा दिला होता.
येडगेवाडी नळपाणी योजना कामातील विहीर आणि इतर कामे अनियमित पध्दतीने होत होती तसे होवू नये म्हणून संतोष येडगे यांनी विषप्राशन आंदोलनाचा निर्णय घेतला होता मात्र आमदार शेखर निकम, उप अभियंता आर.एल लठाड यांनी मध्यस्ती करत योजना नियमानुसारच होईल आणि दोन्ही बाजूने काम करणेबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर संतोष येडगे यांनी आपले १५ ॲागस्ट २०२४ रोजीचे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
येडगेवाडी नळपाणी योजना सौरऊर्जेवर चालवण्याची आमदार शेखर निकम यांची संकल्पना असून संतोष येडगे यांच्या समवेत झालेल्या चर्चेत आमदार शेखर निकम यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. मुळ स्त्रोत असलेल्या विहीरीचे अंतर ४ कि.मी आहे. येथील वीजबिलावर तोडगा म्हणून सौरउर्जेच्या पंपाचा वापर करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असे पंचायत समिती गटविकास अधिकारी भरत चौगुले यांनी यावेळी सांगितले.



