लोकसभा व विधानसभा निवडणूकीत संगमेश्वर – पाटण घाटमार्ग ठरणार कळीचा मुद्दा ; हिवाळी अधिवेशनात या घाटमार्गासाठी निधीची घोषणा व्हावी

संगमेश्वर :- रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणा-या संगमेश्वर – पाटण घाटमार्गाचे काम हाती घेवून ते पुर्णत्वास जावे या साठी समन्वयक संतोष येडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असून संगमेश्वर आणि पाटण तालुक्यातील जनता या कामासाठी खुप आग्रही आहे. हा घाटमार्ग रस्ता झाल्यास संगमेश्वर वासियांचे साधारण ८० कि.मी अंतर वाचणार आहे. हा घाटमार्ग व्हावा अशी वारंवार विनंती केली जात आहे या घाटमार्गाचा थेट लाभ साधारण ४ लाख लोकसंख्येला होणार असून संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, पाटण या चार तालुक्यात निर्णायक मतदार या घाटमार्गाच्या कामाविषयी आग्रही आहे त्यामुळे येणा-या निवडणूकीत थेट मतात परीवर्तन करणारा हा विषय असल्याने विद्यमान सरकारने या विषयावर तातडीने पावले उचलावीत असे स्थानिकांचे मत आहे.
सातारा व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणा-या संगमेश्वर – पाटण घाटमार्गाचे १९९५ ते १९९९ या भाजप – शिवसेना युतीच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ७ मे १९९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे नेरदवाडी या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले होते. या भूमिपूजन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन पालकमंत्री रविंद्र माने, तत्कालीन खासदार सुरेश प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते सुदैवाने आता युतीचे सरकार असून या घाटमार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित असणा-या नेत्यामंधील सर्वच नेते मंत्रीमंडळात मंत्री आहेत त्यामुळे या नेत्यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात या घाटमार्ग कामाबाबत निधीच्या तरतुदीची घोषणा करुन घाटमार्गाच्या प्रश्नाला चालना द्यावी अशी जनतेची मागणी आहे.
संगमेश्वर ते चाफेर ( पाटण ) हा एकूण ४६.६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासन दरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे समन्वयक संतोष येडगे यांनी सांगितले.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग डीपीआर साठी महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती डीपीआर साठी तरतूद केलेल्या निधीसाठी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग संदर्भात समन्वयक संतोष येडगे यांनी मंत्रालयात जावून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांची भेट घेतली होती या भेटीत संतोष येडगे यांनी या घाटमार्गाच्या कामातील त्रुटी सचिव ( रस्ते ) यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचा डीपीआर चे काम पुर्वी दोन्ही जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंडळाने वेगवेगळे करावे अशी तरतूद होती मात्र दोन जिल्ह्यातील बांधकाम मंडळात या कामाबाबत समन्वय होताना दिसत नव्हता म्हणून संतोष येडगे यांनी ही बाब सा.बां सचिव ( रस्ते ) श्री. साळुंखे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सचिव साळुंखे यांनी सा.बां विभागाचे कोकण मुख्य अभियंता यांना निर्देश देत संपुर्ण घाटमार्गाचा डीपीआर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाने करुन तसा प्रस्ताव शासनाला पाठवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. सचिव श्री. साळुंखे यांच्या सूचनेप्रमाणे या बाबत कार्यवाही सुरु असल्याची माहीती कार्यकारी अभियंता श्री. ओटावणे यांनी दिली आहे.



