चिपळूण वन विभागाकडून ५४ घनमीटर लाकूडसाठा जप्त गुन्हाही दाखल

चिपळूण – चिपळूण गाणे येथे अवैधरीत्या वृक्षतोड करून जंगलात साठवलेला सुमारे ५४.०५० घन मीटर इतका लाकूड साठा चिपळूण मधील वन अधिकाऱ्यांनी जप्त केला असून संबंधित जमीन मालकावर गुन्हा देखील दाखल केला आहे. १८ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत चिपळूण वन विभाग कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी परिक्षेत्राचे वनपाल परिसरात गस्त घालत असताना गाणे येथे तीवरे रस्त्याच्याकडेला जंगलात मोठा लाकुडसाठा त्यांच्या निदर्शनास आला. त्याची चौकशी केली असता कोणतीही परवानगी न घेता अवैद्यरित्या वृक्षतोड करून हा लाकूड साठा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत संबंधित जागा मालकावर त्यांनी गुन्हा दाखल केला.तसेच लाकूड साठ्याची मोजमापे घेतली. सुमारे ५४.०५० घन मीटर इतका लाकूड साठा यावेळी आढळून आला.हा संपूर्ण लाकूड साठा वन अधिकाऱ्यांनी जप्त केला असून वन विभागीय अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी जयश्री किर,वनपाल दौ. रा.भोसले,वनरक्षक राहुल गुंढे यांनी ही कारवाई केली.आपल्या आजूबाजूला तसेच जवळच्या परिसरात वृक्षतोड होत असेल तर तात्काळ चिपळूण वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन चिपळूण वन अधिकाऱ्यांनी केले आहे.



