साडवली पंचायत समिती गणातून महायुतीकडून सौ. तृप्ती सचिन मांगले यांना उमेदवारी जाहीर
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

देवरूख- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच पक्षांनी आपापले बालेकिल्ले राखण्यासाठी आणि विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच संगमेश्वर तालुक्यातील साडवली पंचायत समिती गणातून महायुतीतर्फे शिवसेनेच्या (शिंदे गट) सौ. तृप्ती सचिन मांगले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
जनसंपर्काचा ‘मांगले’ पॅटर्न
निवडणुकीत उमेदवारी देताना विजेता उमेदवार हा निकष महत्त्वाचा ठरतो. साडवली परिसरातील प्रसिद्ध उद्योजक सचिन मांगले यांचा या भागात असलेला दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा असलेला मोठा वारसा लक्षात घेऊनच पक्षनेतृत्वाने सौ. तृप्ती मांगले यांच्यावर विश्वास टाकला असल्याचे बोलले जात आहे. सचिन मांगले व मित्रमंडळाने काही दिवसांपुर्वी साडवली येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. सचिन मांगले यांची या भागात क्रेझ असून ते युवा वर्गात अतिशय लोकप्रिय आहेत. ते गरजूंना सढळहस्ते मदत करीत असतात. पालकमंत्री उदय सामंत यांचे विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण*
गेल्या काही काळापासून मांगले परिवाराने साडवली आणि आसपासच्या ग्रामीण भागात वैयक्तिक गाठीभेटी आणि मदतीच्या माध्यमातून आपले स्थान निर्माण केले आहे. या दांडग्या जनसंपर्काचा फायदा आगामी निवडणुकीत महायुतीला होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. सौ. तृप्ती मांगले यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रचाराची रणनीती आता अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. सौ. तृप्ती सचिन मांगले यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छा देण्यात येत आहेत.



