राजिवली सरपंच प्रशांत शिर्के व उपसरपंच सचिन पाटोळे यांना पदावरुन काढून टाकले
लाच स्विकारल्याप्रकरणी सुनावणीत कोकण आयुक्त डॅा. महेंद्र कल्याणकर यांचा महत्वाचा निर्णय

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतच्या कामाचे बील काढण्यासाठी ठेकेदाराकडून प्रत्येकी १५ हजाराची लाच घेताना राजिवली ग्रामपंचायत सरपंच प्रशांत शिर्के व उपसरपंच सचिन पाटोळे यांना ११ मे रोजी रत्नागिरी लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांना त्यावेळी अटक केली होती सरपंच प्रशांत शिर्के, उपसरपंच सचिन पाटोळे यांना १२ मे २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने जामीन नाकारत एक दिवसाची पोलीस कस्टडी सूनावली होती १३ मे २०२३ रोजी जामीनावर सुटका करण्यात आली होती.सरपंच प्रशांत शिर्के आणि उपसरपंच यांच्यामुळे जिल्हा परीषद रत्नागिरी व पंचायत समिती देवरुख यांची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला होता. त्यांच्यावर विभागीय कोकण आयुक्त डॅा. महेंद्र कल्याणकर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ ( १ ) अंतर्गत अपात्रतेची कारवाई करत सरपंच प्रशांत शिर्के यांना सरपंच व सदस्य पदावरुन तर सचिन पाटोळे यांना ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदावरुन काढून टाकत आपला निर्णय घोषीत केला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत सरपंच प्रशांत शिर्के व उपसरपंच सचिन पाटोळे यांनी ग्रामपंचायतीच्या बीलाची रक्कम सोडण्यासाठी संबंधीत ठेकेदाराकडून प्रत्येकी १५ हजाराची लाच मागितल्याची तक्रार एसीबी रत्नागिरी यांच्याकडे प्राप्त झाली होती. रत्नागिरी एसीबी पथकाने लाचेची पडताळणी करुन सापळा रचत सरपंच आणि उपसरपंच यांना ११ मे रोजी रंगेहाथ पकडले होते. सरपंच आणि उपसरपंच यांच्या कारवाईमुळे पंचायत समिती, जिल्हा परीषद ची बदनामी झाल्याचा अहवाल जिल्हा परीषदेने विभागीय कोकण आयुक्तांना पाठवून लाचखोर सरपंच प्रशांत शिर्के व उपसरपंच सचिन पाटोळे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती या मागणीनुसार कोकण आयुक्तांनी सुनावनी घेत सरपंच प्रशांत शिर्के व उपसरपंच सचिन पाटोळे या दोघांनाही अपात्र घोषीत केले आहे.



