कोंढे ग्रा. पं. सदस्या सुनिता तटकरे यांचा विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू

चिपळूण – पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल तटकरे यांच्या पत्नी आणि कोंढे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सुनिता सुनिल तटकरे (५२) यांचा विद्युत भारीत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. १ सप्टेबर रोजी सायंकाळी घडली. शनिवारी कोंढे माळवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनिता तटकरे या सायंकाळी ७ वा.च्या सुमारास भांडी धुण्यासाठी घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडखाली बसल्या होत्या. याचवेळी उंदराने कुरतडलेल्या विद्युत भारीत वाहिनीचा त्या पत्र्याच्या शेडला स्पर्श होऊन सुनिता तटकरे यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्यांना शॉक लागल्याचे कळताच त्यांचे पती, नातेवाईक व आजुबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी चिपळुणातील एका खाजगी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्या मृत झाल्याचे सांगितले. हे ऐकताच सुनिल तटकरे आणि कुटुंबांच्या पायाखालची वाळूच सरकली. या घटनेचा पोलिसांमार्फत पंचनामा करण्यात आला आहे. कै. सुनिता तटकरे या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असत. महिला सक्षमीकरणातील चळवळीतही त्यांचा सहभाग असायचा. कोंढे ग्रामपंचायतीमध्ये त्या दोन वेळा सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. सध्या त्या विद्यमान सदस्या म्हणून काम करीत होत्या. ऋणानुबंध बचत गटाच्या त्या पदाधिकारीही होत्या. शेतीची त्यांना आवड होती. गुरे-शेळ्या सांभाळून त्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय शांत, संयमी आणि प्रेमळ होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, चिपळूण पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन ठसाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुनिल तटकरे व कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या निधनाबद्दल कोंढे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व दोन मुली, जावई असा परिवार आहे.



