आपला जिल्हा

विधानसभा निवडणूक २०२४ ! चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हे चाकरमानी ठरवणार ?

संगमेश्वर :- २६५ चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचार शिगेला पोहचला असून प्रचाराचे दोनच दिवस शिल्लक असताना विजयाची गणिते जुळवण्याच त्या त्या आघाड्याचे पदाधिकारी मग्न आहेत मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार ठरवण्यासाठी मतदारसंघाबाहेरील चाकरमान्यांची मते निर्णायक ठरणार असल्याने कोणत्या आघाडीचा उमेदवार मते आयात करण्यात यशस्वी होतो आणि विजयी मोहोर लावतो याचीच उत्सुकता लागून राहीली आहे.

चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची रचना ही चिपळूण तालुक्यातील परशुराम येथून सुरु होवून साखरपा विभागातील दख्खन,मुर्शी, निवधे गावापर्यंत पोहचते या मतदारसंघात पश्चिम दिशेला खाडीपट्टा तर पुर्वेला सह्याद्री भाग येतो. मतदारसंघात ८० टक्के भाग हा ग्रामीण आहे. ग्रामीण भागात नसलेले उद्योगधंदे आणि हाताला नसलेले काम यामुळे स्थानिक मतदारांना मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये करावे लागलेले स्थलांतर ही मोठी समस्या आहे. आपल्या रोजगारासाठी मतदारसंघाबाहेर स्थलांतरित झाले आहेत.चिपळूण शहर, देवरुख शहर, साखरपा आणि संगमेश्वर बाजारपेठ येथील व्यवसाय वगळता आवश्यकतेनुसार रोजगाराच्या संधी नसल्याने आणि ग्रामीण मतदारांना उपजिवीकेचे साधन नसल्याने स्थलांतर हा मुद्दा खुप महत्वाचा बनला आहे. या मतदारसंघातील मतदारांचे अन्य शहरात झालेले स्थलांतर आणि आता निवडणुकीसाठी आयात करुन थेट ७० टक्केपर्यंत वाढवावी लागणारी टक्केवारी उमेदवारांसाठी कसरत ठरणार आहे. आणि हीच टक्केवारी चिपळूण – संगमेश्वर विधानसभेचा आमदार ठरवणार आहे.

चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात २०१९ ला राष्ट्रवादी कॅांग्रेस चे विद्यमान आमदार शेखर निकम आणि शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांच्यात थेट लढत झाली होती या लढतीत शेखर निकम यांनी बाजी मारली होती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेखर निकम यांना १ लाख १ हजार ५७८ हजार मते मिळाली होती तर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांना ७१ हजार ६५४ मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांना तिवरे धरण फुटल्याचा फटका बसला होता.

विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शेखर निकम पुन्हा मैदानात आहेत तर महाविकास आघाडीकडून वाशिष्ठी डेअसरीचे संचालक प्रशांत यादव मैदानात उतरले आहेत. दोन्ही उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत.विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे जाळे भक्कम आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा विडा उचलला आहे. या तुल्यबळ लढतीत उपजिवकेसाठी मतदारसंघाबाहेर गेलेले ७० टक्के चाकरमानी मतदार पुन्हा मतदारसंघात निवडणूकीसाठी येवून कोणाच्या पारड्यात मतदान करणार यावरच विजयाची गणिते अवलंबून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button