चिपळूण येथील सांस्कृतिक केंद्राचे उद्या लोकार्पण

चिपळूण – कोकणातील सांस्कृतिक चळवळीचा वारसा असलेले आणि गेली सतरा वर्षे विविध कारणांनी समस्यांच्या गर्तेत सापडलेले चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र कलाकार अन् रसिकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहे.
उद्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी मंगळवार दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. या वातानुकुलित नाट्यगृहाचा लोकार्पण सोहोळा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, खासदार सुनिल तटकरे यांच्यासह कोकणातील आमदार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत चिपळूण नगर पालिकेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र इमारत नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहोळा पार पडणार आहे.
यानिमित्ताने सायंकाळी ४ वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आ. निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड, आ. अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. भास्करशेठ जाधव, आ. डॉ. राजन साळवी, आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.



