संगमेश्वर तालुका धनगर समाज संघटनेचा महायुती चे उमेदवार शेखर निकम यांना जाहीर पाठींबा – तालुका उपाध्यक्ष श्री. तुकाराम येडगे.

संगमेश्वर- तालुक्यातील धनगर समाजाची मातृसंस्था असलेल्या जय मल्हार धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने तालुक्यातील समाजाची विकास कामे करण्यात येत असतात समाजाला विकासाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी संघटना सदैव काम करत असते. तालुक्यातील धनगरवाड्यांमधील संघटनेने सुचविलेल्या विकास कामांना गती देणा-या चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना धनगर समाजाचा जाहीर पाठींबा असल्याचे समाज संघटनेचे उपाध्यक्ष तुकाराम येडगे यांनी जाहीर केले आहे.
विधानसभा निवडणूकच्या अनुषंगाने जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्थेची बैठक पार पडली या बैठकीला समाजाचे जयमल्हार धनगर समाजाचे उपाध्यक्ष श्री तुकाराम येडगे तसेच पदाधिकारी कृष्णा बावधने, हेमंत झोरे, तुकाराम बोडेकर, सखाराम शेळके, शांताराम शेळके, राजेंद्र शेळके,मधू आखाडे, भागोजी आखाडे, विठोबा फोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील साधारण ३५ धनगरवाड्या या चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात येतात संगमेश्वर तालुक्यातील १५ हजारांपेक्षा जास्त मतदान हे धनगर समाजाचे आहे. समाजाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून महायुतीचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी कोसूंब या ठिकाणी समाज भवन उभारणीसाठी पुढाकार घेत निर्धारित वेळेत समाज भवनाचे काम पुर्ण करुन आपली वचनपूर्ती केली तर त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या धनगरवाड्यांमधील मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत विविध योजनांच्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध करुन दिला. आमदार शेखर निकम यांची वचनबद्धता लक्षात घेवून संगमेश्वर तालुक्यातील धनगर समाजाने विद्यमान आमदार तथा चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महायुती चे उमेदवार शेखर निकम यांना जाहीर पाठींबा दर्शविला आहे. धनगर समाजाच्या पाठींब्यामुळे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांची ताकद अधिक वाढली आहे.



