राज्य सरकारच्या १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग अव्वल ; अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर – पाटणकर यांच्या कार्याचा गौरव

मुंबई – विकसित महाराष्ट्र २०४७ कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा अंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था, इ. आस्थापनामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला. या मूल्यांकनात २०० पैकी १८६.७५ गुण मिळवून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्यात अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर – पाटणकर यांच्या पारदर्शक, गतिमान प्रशासकीय कामाचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या मोहिमेमध्ये संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त आस्थापनांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन गुणांकन व वर्गवारी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
या कार्यक्रमाचे मूल्यमापन करताना संबंधित आस्थापनांचा आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, जेष्ठता सूची, पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा भरती, iGOT नोंदणी व प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे अशा ९ घटकांचा समावेश होता.
सदर कार्यक्रमांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India) प्रशासकीय विभागांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या गुणांकनाची माहिती संकलित करून अहवाल सादर केला आहे
एकूण ९ उद्दिष्टांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आयोग, प्राधिकरण, मंडळ, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा यांचे गुणांकन आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. (जिल्हा परिषदांचे गुणांकन ८ फेब्रुवारी २०२६ नंतर जाहीर करण्यात येईल)
१५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कार्यालय प्रमुख व त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचा राज्य शासनातर्फे लवकरच सन्मान करण्यात येईल.



