पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे – केंद्रीय मंत्री ना.मुरलीधर मोहोळ

पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, यासंदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीघर मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होतं, म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे.
पुण्याचं विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होतं. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचं नाव देणं, हे अधिक समर्पक असल्याचे मत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.



