नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001:2015 मानांकन प्राप्त ; पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

ऐरोली – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत सेवा प्रदान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001:2015 मानांकन प्राप्त केले आहे. या मानांकनात आयुक्तालयाच्या हद्दीतील ४ विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये, त्यांच्या अधीन असलेली २२ पोलीस ठाणे (सायबर पोलीस ठाणेसह) तसेच गुन्हे शाखा, विशेष शाखा, प्रशासकीय शाखा, पोलीस उप आयुक्त – वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग आणि मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष (EMC) अशा मिळून एकूण ३१ शाखांचा समावेश आहे.
ISO मानांकनाचा प्रमुख उद्देश म्हणजे:
• सर्व सेवांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्ता निकष लागू करून विश्वासार्हता वाढविणे.
• सर्व कामकाज वेळेत, पारदर्शक व कार्यक्षमतेने पूर्ण करणे.
• प्रत्येक कामासाठी स्पष्ट अशी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करून काटेकोर अंमलबजावणी करणे
• त्रुटी कमी करून नवनवीन उपक्रमांद्वारे सतत सुधारणा साधणे.
• सर्व स्तरावर लोकसहभाग वाढवून जनतेचा विश्वास बळकट करणे.
या मानांकनामुळे नवी मुंबईतील नागरिकांना उत्तम सेवा, अधिक सुरक्षितता आणि विश्वासार्ह पोलीस प्रशासन मिळणार आहे. आज दिनांक २५/११/२०२५ रोजी आयोजित गुन्हे आढावा बैठकीत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या हस्ते ISO मानांकन प्राप्त शाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा ISO प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.



