आपला जिल्हा

निवासी, व्यावसायिक संकुलातील ओल्या कचऱ्याची प्रक्रीया करुन विल्हेवाट लावा – मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी

मुंबई – निवासी, व्यावसायिक संकुलातील ओल्या कचऱ्याची त्रयस्थ संस्थांमार्फत वाहतूक करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर निवासी, व्यावसायिक आस्थापनांच्या परिसरातच प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे किंवा संबंधित कचरा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करणे अनिवार्य आहे, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

तसेच, निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर आपल्या परिसरातच प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांना मालमत्ता करातून सवलतदेखील देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) निवासी / व्यावसायिक संकुलाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दि.१२ ॲागस्ट रोजी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्रीमती जोशी यांनी निर्देश दिले.

उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) ही सेवा आता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आस्थापनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे, अशा आस्थापनांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन या सेवेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे..

Related Articles

Leave a Reply

Back to top button